Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाकुर्डे योजनेसाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद - उंडाळकर
कराड, ७ जून/वार्ताहर

 

कृष्णा खोरे प्रकल्पातील वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेला राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पात अपेक्षित २५ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी दूरध्वनीवरून दिली. वाकुर्डे योजनेस अधिवेशनात २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असल्याचा विश्वास यापूर्वी उंडाळकरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पाकडे दक्षिण डोंगरी विभागातील जनतेचे डोळे लागले होते.
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, योजनेसाठी आजवर ५० कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून वारणेचे पाणी कराड तालुक्यात खळखळणार आहे. दोन टप्प्यातील या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी आता अपेक्षित निधीची तरतूद झाल्यानंतर कराड, शिराळा व वाळवा तालुक्यातील १५ हजार ७७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामध्ये कराड तालुक्यातील २२०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
वाकुर्डे योजनेस सध्या २५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. राज्य शासनाने अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होऊन कराड तालुक्यातील तब्बल २२०० हेक्टर जमिनी येत्या सहा महिन्यातच ओलिताखाली येतील, असा विश्वास आमदार उंडाळकर यांनी व्यक्त केला आहे. या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून एकूण २८ हजार ३५ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. एकूण ४८५ कोटी रुपयांची ही योजना असून, २५ कोटी रुपयांच्या उपलब्ध निधीमुळे पहिल्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कोणताही कालवा न काढता येणवे बोगद्याद्वारे कराड तालुक्याला पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे यांचे सहकार्य मिळाले आहे. २५ कोटींच्या निधीसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. गृहमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाल्याबद्दल उंडाळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.