Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गावाच्या विकासासाठी सर्वानी मतभेद विसरावेत -विजयसिंह मोहिते पाटील
पंढरपूर, ७ जून/वार्ताहर

 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत गावकऱ्यांनी मतभेद विसरून विकास-कामास मदत करून गावाचा विकास साधावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
सन २००८-०९ सालातील बक्षीसपात्र ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण समारंभ पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे आयोजित केला होता. जिल्ह्य़ातील सात ग्रामपंचायतींना पुरस्कार मोहिते पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, गावातील सर्वानी निवडणुका संपताच आपसातील मतभेद विसरून विकासकामाला गती द्यावी. तंटामुक्त गाव योजनेत गावांनी सहभागी होऊन विकास करावा. बांधावरून ज्या शेतीमध्ये भांडणे होतात, ती कमी करण्यासाठी प्रत्येकाने लक्ष घालणे ही काळाची गरज आहे.
या वेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले त्यांचा, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी जगदीश पाटील म्हणाले की, तंटामुक्तीमध्ये लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. लोकसहभागाशिवाय गती येत नाही. महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत सातत्य टिकवावे. सध्या विविध प्रकारचे असे एक लाख खटले पडून आहेत. यासाठी ही योजना उत्तम आहे. ज्या सात ग्रामपंचायतींना बक्षिसे मिळाली त्यांनी त्याचा उपयोग गावातील सार्वजनिक कामासाठी करावा.
ग्रामपंचायत सदस्यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.