Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रेशन दुकाने बचत गटांकडे देण्याची योजना जतमध्ये फसली
जत, ७ जून / वार्ताहर

 

रेशनिंग दुकानातील काळाबाजार रोखला जावा, त्यात पारदर्शीपणा यावा व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या उदात्त हेतूने गावातील स्वस्त धान्य दुकाने महिला बचतगटांना चालविण्यास देण्याचा निर्णय झाला खरा..! पण त्याची अंमलबजावणी न झाल्याने जत तालुक्यात ही योजना बारगळली आहे.
जत तालुक्यात रास्त भाव धान्य दुकानांची एकूण संख्या १७६ इतकी आहे. यातील १८ दुकाने विकास सोसायटीमार्फत चालवली जातात. महिला व मागासवर्गीय आरक्षितांकडून अनुक्रमे १४ व १६ धान्य दुकाने चालवली जातात, तर इतरांकडून १२८ दुकाने चालवली जातात. यात महिला बचतगटाचा अद्यापही समावेश झालेला नाही. तसेच रॉकेल विक्री दुकानांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.
जत तालुक्यात रॉकेलचे तीन घाऊक व्यापारी आहेत, तर किरकोळ रॉकेल विक्री केंद्राची संख्या २०७ इतकी आहे. यात महिला व मागासवर्गीय आरक्षण नाही. त्याचबरोबर महिला बचतगटांनाही संधी नाही. दोन वर्षांंपूर्वी स्वस्त धान्य दुकाने केवळ महिला बचतगटांनाच चालविण्यास दिली जातील, असा फतवा राज्य व जिल्हा प्रशासनाने काढला होता. तसेच काळाबाजारात अडकलेल्या दुकानदारांचा परवाना रद्द करून ती दुकाने महिला बचतगटांना चालविण्यास देणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र या घोषणेची जत तालुक्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे ही योजना जत तालुक्यात बारगळली असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.