Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सद्गुणांद्वारे समाजाचे ऐक्य साधले जाईल - भय्यू महाराज
इचलकरंजी, ६ जून/वार्ताहर

 

राष्ट्रउभारणीसाठी सद्गुणांची जोपासना झाली पाहिजे, संपत्तीने किती मोठे आहोत हे पाल्यांना दाखविण्याऐवजी संस्काराने किती उंच आहोत हे पालकांनी दाखविण्याची वेळ आली आहे. या सद्गुणाद्वारे समाजाचे ऐक्य साधले जाईल, असे मत भय्यू महाराज यांनी व्यक्त केले. येथील लायन्स क्लबच्या सभागृहात सूर्योदय परिवार, इचलकरंजी यांच्या वतीने भय्यू महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतमाता, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर प्रवचनाची सुरुवात झाली. भावना ते मुक्तीचा प्रवास त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उलगडा केला.
माणसांच्या भावना कोणत्या यावर त्यांच्या कार्याची प्रेरणा अवलंबून असते, असे नमूद करून भय्यू महाराज म्हणाले, देशावर कोणतेही संकट आले की, सर्वधर्मीय प्रार्थना करून संकट निराकरणाची याचना करतात. समाजाची विभागणी धर्मावर होत नाही तर मतावर होते. जातीयतेच्या मर्यादा ओलांडून धर्म सर्वाना एक करतो. शास्त्राने बुद्धी रचली असल्याने ती शास्त्राप्रमाणे चालवू, असे म्हणणारा एक वर्ग आहे. पण याच्या उलट बुद्धीने शास्त्राला रचले, असे समर्थन करणारा एक वर्ग आहे. मतांतरातील हे द्वंद्व समाजात वाढीस लागले आहे, तर दुसरीकडे पाच लाखांचे पॅकेज घेणारा वर्ग समाजासाठी पाच रुपये खर्च करण्यास तयार नाही. या प्रवृत्तीमुळे वेगवेगळ्या स्तरांवरील दहशतवाद फोफावत चालला आहे. अशा स्थितीत पोस्टरवर आदर्श निर्माण करण्याऐवजी तो अंतरंगातून, कार्यातून उमटायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, संतांनी मांडलेल्या विचारांचा स्वीकार लगेच होतो हे भय्यू महाराजांनी सूर्योदय परिवाराच्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तरुणांमध्ये राष्ट्रचेतना जागविण्याचे त्यांचे काम अद्वितीय आहे.