Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निधीचे समान वाटप न झाल्याने नगरसेवकांवर अन्याय
सांगलीतील काँग्रेस नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

 

शासकीय अनुदानातील अडीच कोटी रुपयांच्या निधीचे समान वाटप न करता सांगली महापालिकेतील सत्ताधारी विकास महाआघाडीने ४० टक्के नगरसेवकांवर अन्याय केला आहे. या निधीचे येत्या दोन ते तीन दिवसांत समन्यायी वाटप न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विरोधी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
राज्य शासनाने महापालिकेला सव्वा कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. त्यात महापालिकेने सव्वा कोटी रुपयांची भर घालून अडीच कोटी रुपयांची विकासकामे अपेक्षित आहेत. मात्र या कामांना पालकमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक आहे. सत्ताधारी विकास महाआघाडीने काही महिन्यांपूर्वी या निधीतील विकासकामे आपल्याच नगरसेवकांच्या प्रभागात करण्याचा घाट घातला होता. त्याबाबत काँग्रेसने पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही यादी फेटाळत पुन्हा दुरुस्त्या करण्याची सूचना करण्यात आली होती.
प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात चार ते पाच लाख रुपयांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. पण विकास महाआघाडीने ठरावीक नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत महापालिका क्षेत्रात झालेली कामे ही काँग्रेसच्या कालावधीतील आहेत. विकास महाआघाडीने एकही नवे काम सुरु केलेले नाही, अशी टीका करीत येत्या दोन ते तीन दिवसांत या निधीचे समन्यायी वाटप न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही लक्ष्मण नवलाई व बाळाराम जाधव यांनी दिला आहे.
एकाच प्रभागात दहा लाख!
शासकीय अनुदानातील कामांची निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मिरज शहरातील बुधवार पेठ व खतिब गल्ली या परिसराच्या विकासासाठी तीन कामे घेण्यात आली असून त्यातील विविध कामांसाठी दहा लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे या कामांची निविदा काढताना ही कामे प्रभाग क्रमांक १६ मधील असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १६ हा सांगली शहरातील असून या कामासाठी वैरण बाजार, कनवाडकर मशिद, खतिब गल्ली हा परिसर मिरजेतील आहे. त्यामुळे या विकासकामांच्या यादीत मोठय़ा प्रमाणात घोळ घातला गेला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक साजिदअली पठाण यांनी केला आहे.