Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बलुतेदारांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्र्यांचाच खोडा
राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षांचा आरोप
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

 

बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीस मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच जाणीवपूर्वक खोडा घातला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला. बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाविरोधात लवकरच ‘बोंबाबोंब’ आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात बारा बलुतेदारांसाठी ११ विकास महामंडळे असून त्यांची २२०० कोटी रूपयांची कर्जे थकीत आहेत. बारा बलुतेदारांच्या व्यवसायाला दुष्काळ व मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या बारा बलुतेदारांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने गेल्या वर्षभरापासून केली जात आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीस संमती दिली आहे. तसेच त्यांनी तशी घोषणाही केली होती.
मात्र या कालावधीत राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारमध्ये बदल झाला. त्यामुळे बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीची प्रक्रिया मंदावली. सध्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक आहेत. परंतु मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका दिसत नाही. यामुळे बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीत त्यांचा अडथळा ठरत आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येत्या अर्थसंकल्पापूर्वी बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीची घोषणा करावी. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेणार आहे.
त्यावेळी येत्या अर्थसंकल्पापूर्वी बारा बलुतेदारांच्या कर्जमाफीची घोषणा करावी व बारा बलुतेदारांच्या विकास महामंडळास देण्यात येणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास राज्य शासनाविरोधात राज्यभर बोंबाबोंब आंदोलन उभारण्याचा इशाराही भानुदास माळी यांनी दिला.