Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्लॅस्टिक पिशव्यांविरोधी सांगलीत तीव्र मोहीम
सांगली, ७ जून / प्रतिनिधी

 

कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर आता महापालिकेने करडी नजर ठेवली असून यापुढे आरोग्य विभागाकडून प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात जोरदार मोहीम राबवली जाणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीस १०० रूपये, तर वितरकाला दीड हजार रूपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या आठवडय़ात महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमबाह्य़ प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून संबंधितांकडून एक लाख रूपयांचा दंडही वसूल केला होता. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येणार असून व्यापारी, दुकानदार, उपाहारगृहे, किरकोळ विक्रेते, किराणा भुसार स्टेशनरी, कापड दुकानदार व हातगाडी यांनी कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर व विक्री तात्काळ बंद करावी, असे आवाहनही आयुक्त मेतके यांनी केले आहे.