Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कागल ग्रामीण रुग्णालयात अधिकाऱ्यांची मनमानी
कागल, ७ जून / वार्ताहर

 

येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये बाळंतपणासाठी विचारणा करण्यासाठी आलेल्या एका महिलेला प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उर्मट उत्तरे देवून तिची बोळवण केली. एका महिलेला दिलेल्या या वागणुकीबद्दल जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारची दुरूत्तरे दिली. विशेष म्हणजे हे सर्व ग्रामीण रूग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर घडले.
बेघर वसाहतीमधील नम्रता राजू गवळी ही गरीब महिला गुरूवारी ग्रामीण रूग्णालयात बाळंतपणाच्या संदर्भात वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुमचा रक्तदाब कमी आहे, तुम्ही कोल्हापूरला जा असा सल्ला दिला. यावेळी त्यांची भाषा उर्मटपणाची होती. एका गरीब महिलेस अशा प्रकारची वागणूक दिल्याचे पत्रकारांना समजल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती काय आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेतली तेव्हा त्यांनाही उध्दट उत्तरे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोरच हा कनिष्ठ अधिकारी असभ्य भाषेत बोलत होता. या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकार निघून गेल्यानंतर कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.