Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण
दुहेरी खुनाचा आरोप १४ जूनपर्यंत कोठडी * पद्म‘सिंह’ सीबीआयच्या पिंजऱ्यात

मुंबई, पनवेल, ७ जून / प्रतिनिधी / वार्ताहर
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी पाच तास कसून चौकशी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांना केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) शनिवारी रात्री उशिरा अटक केली. अटकेनंतर आज दुपारी पाटील यांना पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पाटील यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम १२०(ब) आणि ३०२ नुसार पवनराजे यांच्या हत्येचा कट रचून त्यांची व त्यांच्या चालकाची हत्या केल्याचा दुहेरी आरोप ठेवण्यात आला आहे.

उस्मानाबादमध्ये तणाव, ‘आयबीएन-लोकमत’च्या गाडीवर हल्ला
उस्मानाबाद, ७ जून /वार्ताहर

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात पद्मसिंहांच्या अटकेचे वृत्त धडकताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज हिंसक आंदोलन सुरू केले. आज सकाळपासूनच त्यांनी ‘उस्मानाबाद बंद’चे आवाहन केले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांना लक्ष्य केले आणि त्यानंतर त्यांनी वृत्तसंकलनासाठी उभ्या असलेल्या आयबीएन-लोकमत या मराठी वृत्तवाहिनीच्या वाहनावर तुफान दगडफेक केली.

काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची शक्यता पवारांनी फेटाळली
नवी दिल्ली, ७ जून/वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नाही, असा निर्वाळा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पी. ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून त्यांना विरोध करीत काँग्रेसचा त्याग केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार बोलत होते. अर्थात संगमा यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नसल्याचे त्या भेटीनंतर स्पष्ट केले होतेच.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
दहशतवादी निसटल्याचा संदेश करकरे, कामटे, साळसकर यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही..!
कविता अय्यर/स्वाती खेर

मुंबई, ७ जून

२६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि निरीक्षक विजय साळसकर हे तीन अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. कामा इस्पितळाजवळील रंगभवनला लागून असलेल्या गल्लीत मुंबई पोलिसांच्या टोयाटो क्वालीस गाडीतच तिघांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशभर या दहशतवादी हल्ल्याच्या भयाची लाट पसरली.या तीन अधिकाऱ्यांच्या हत्येआधी दोन तास जे जे घडले त्याचा बारीक-सारीक तपशील ‘इंडियन एक्स्प्रेस’ने गोळा केला आहे. करकरे, कामटे आणि साळसकर हे मृत्यूच्या दाढेत सापडण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यावर याद्वारे प्रकाशझोत पडला आहे.(उर्वरित वृत्त)

राज्यातील आगमनाची वेळ पाळली
मान्सून सिंधुदुर्ग-रत्नागिरीत दाखल
पुणे, ७ जून/खास प्रतिनिधी

नैर्ऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्याची वेळ पाळली असून, आज तो गोवा ओलांडून कोकणात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ांमध्ये पोहोचला. त्याच्या पुढच्या प्रवासाबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र येत्या दोन दिवसांत कोकणासह राज्याच्या काही भागांत वादळी पाऊस पडत राहील, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. कोकणात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. विशेषत: दक्षिण कोकणात त्याची तीव्रता अधिक होती. रत्नागिरी येथे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तब्बल १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय कर्नाटक व गोव्यातही मोठा पाऊस पडला. मान्सून सामान्यत: ६-७ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होतो. त्यानुसार आज कोकणात पोहोचून त्याने आपली वेळ पाळली आहे. त्याची उत्तर सीमा आता रत्नागिरी, कर्नाटकमध्ये गडग, आंध्र प्रदेशात अनंतपूर, कलिंगपट्टण, ओरिसात पारादीप, बालासोर, पश्चिम बंगालमध्ये बनकुला व सिक्कीम या गावांमधून जाते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनारपट्टीलगत अरबी समुद्रात केरळ ते दक्षिण कोकण दरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यांचा परिणाम म्हणून किनारपट्टीलगत पाऊस सुरू आहे. कोकणात आज रत्नागिरी (१३ मिलिमीटर), मुंबई (०.१) येथे पाऊस झाला.

 

प्रत्येक शुक्रवारी