Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

पाठदुखीमुळे उद्धव ठाकरे मुंबईला
शिवसैनिकांची घोर निराशा

औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक पाठदुखीचा त्रास झाल्यामुळे ते मुंबईला औरंगाबादचा दौरा अर्धवट टाकून रवाना झाले. त्यांच्या उपस्थितीविना विजयी मेळावा झाल्यामुळे शिवसैनिकांची घोर निराशा झाली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघात हॅटट्रिक करण्याचा विक्रम नोंदविला.

ही रेष धावणारी
काल रविवार होता. कुणाकडेही जायचं नाही. ज्याला त्याला त्याच्या पद्धतीनं सुट्टी घालवायची असते. कुणाचे काही बेत असतात. कुणाचं काही ठरवलेलं असतं. कुठं गावाला जायचं असतं. गावाला जाणं रद्द करून दुसरे काही काम करायचं असतं. सोमवार ते शनिवार बऱ्याच गोष्टी मनातच खेळत असतात. निवांत आणि पुरेसा वेळ भेटत नाही म्हणून राहतात तशाच. रविवारी करूयात म्हणून बाजूला पडलेल्या असतात. टेबल गच्चं भरलेला. पुस्तकं अस्ताव्यस्त. नंतर वाचूयात म्हणून काही विशेष पुरवण्या, अर्धवट वाचायची राहिलेली पुस्तकं. बाहेरच्या गेटवर कॉलबेलमध्ये काहीतरी गडबड आहे. बंद आहे.

बसपाच्या प्रदेशाध्यक्षांसह तिघांना बेदम मारहाण?
पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप
औरंगाबाद, ७ जून /प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत थेट पैसे घेऊन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आणि आता पदांसाठीही पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरूड, उपाध्यक्ष सुरेश साखरे आणि कोषाध्यक्ष चांगदेव गायकवाड यांना बेदम मारहाण केली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या तिरुमला मंगल कार्यालय येथे ही घटना घडली.

पोलिसांच्या अनास्थेमुळे सेवाभावी डॉक्टरांच्या मृतदेहाची सहा तास ससेहोलपट!
नांदेड, ७ जून/वार्ताहर

‘आधार’ हॉस्पिटलचे खऱ्या अर्थाने आधार असलेले तरुण डॉ. सुभाष मरळककर (वय ३४) यांना मृत्यूनंतरही शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा अनागोंदी कारभार व कामचुकार वृत्तीचा फटका बसला. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार करण्यासाठी केलेली चालढकल यामुळे तब्बल सहा तास या डॉक्टराच्या पार्थिव रुग्णालयात पडून होते. नांदेड शहरापासून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या मरळक येथील सुभाष मरळककर या तरुणाने स्वत:च्या बुद्धिमत्तेने व प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.

आघाडीच्या कारकीर्दीत कायद्याचे राज्यच नाही -गोपीनाथ मुंडे
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीत कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सत्तेवर येण्यासाठी कटीबद्ध आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आयुक्तांचा अभियंत्यांवर अविश्वास?
तांत्रिक कक्षाची पुन्हा स्थापना
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी
प्रत्येक कामाच्या तांत्रिक तपासणीसाठी औरंगाबाद पालिकेत पुन्हा एकदा तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याकरीता एका उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात आली असून, अभियंत्यांनी निश्चित केलेल्या कामाची तपासणी एक उपअभियंता करणार असल्यामुळे आयुक्त वसंत वैद्य यांनी कार्यकारी अभियंत्यांवर अविश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होत आहे.

वीज पडून २ ठार, २ जखमी
लातूर, ७ जून /वार्ताहर

लातूर जिल्ह्य़ातील जळकोट तालुक्यातील डोंगरकुन्हाळी येथील विनोद नारायण शिंदे (वय १९) व लातूर तालुक्यातील गातेगाव येथील गणेश शंकर काळे (वय २५) हे वीज पडून ठार झाल्याची घटना शनिवारी (६ जून) घडली.शनिवारी सायंकाळी जिल्ह्य़ात विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात वीज पडून जनावरे व माणसे दगावण्याच्या घटना घडल्या. जळकोट तालुक्यातील डोंगरकुन्हाळी येथे विनोद शिंदे हे जागीच मरण पावले. तर त्यांचे वडील नारायण शिंदे व तुकाराम सोनकांबळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ातील जळकोट, नागझरी, सामनगाव, निवळी, गातेगाव व कारेपूर या ठिकाणी ११ जनावरे व ५ शेळ्या वीज पडल्यामुळे मरण पावल्या आहेत. लातूर तालुक्यातील गातेगाव येथील गणेश शंकर काळे हेही वीज पावल्यामुळे मरण पावले.

आपत्ती व्यवस्थापन शिबिराची तयारी पूर्ण
औरंगाबाद, ७ जून/प्रतिनिधी
एनसीसी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित आपत्ती व्यवस्थापन शिबिर ९ जूनपासून सुरू होत असून तयारी पूर्ण झाल्याचे संयोजन समितीने सांगितले.३५ जिल्ह्य़ांमधून १०५० विद्यार्थी या शिबिराचा लाभ घेणार आहेत. केवळ एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणादरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याचे डांबरीकरण व सजावटीवर लक्ष देण्यात आले आहे. ९ ते २० जूनदरम्यान होणाऱ्या आव्हान-२००९ या वर्गाचे उद्घाटन राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते मंगळवारी सिडकोच्या नव्या नाटय़गृहात होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल आर. के. करवाल, ब्रिगेडियर महेशचंद्र माथुर, कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची उपस्थिती राहणार आहे.

जेवणाचे बिल न देता हॉटेल चालकाला लुटले
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी
जेवणाचे बील जास्त झाल्याचा आरोप करत हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्यानंतर चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल प्रेम पॉप्यूलर पंजाब येथे घडली. विष्णू पुंजाराम मुळे (वय ४५, रा. जयभवानीनगर) आणि त्याच्या एका साथीदाराने ही मारहाण केल्याचे हॉटेल मालक राजू ग्यानंद कमलानी (वय ३९, रा. वेदांतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. काल साडेदहा वाजता मुळे हा आणखी एका साथीदारासह जेवणासाठी आला होता. जेवणानंतर बिलावरून त्याने वाद घातला. बील जास्त लावल्याचा आरोप त्याने केला होता. त्याने बिल तर दिले नाहीच उलट कमलानी यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला. हॉटेलातील ग्लास, बाटल्या तसेच काचाची मोडतोड केली. कमलानींच्या तक्रारीवरून मुळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. समध यांची प्राणिसंग्रहालयाला भेट
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयास मुंबईच्या पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समध यांनी आज भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारीही होते. दोन वर्षांपूर्वी या प्राणिसंग्रहालयातील ३० हरिणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पशू विभागातील तज्ज्ञ येथील प्राण्यांची नियमितपणे पाहणी करतात. डॉ. समध यांची भेट ही त्याचाच एक भाग असल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. हरिणांच्या मृत्यूनंतर प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यानंतर प्राण्यांच्या मृत्यूचे प्रकार झाले नाहीत.

जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी
गांधीनगर, खोकडपुरा येथे जुगार खेळत असलेल्या पाचजणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संजय साहेबसिंग रिडलॉन, नासेरखान हुसैनखान, नरेश साहेबसिंग रिडलॉन, सूरज सुग्रीवसिंह रिडलॉन आणि गणेश दीपचंद त्याहारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरक्षक रमाकांत पडवळ यांनी छापा घालून वरील पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शॉर्टसर्किटमुळे शहर बसला आग
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी

अचानक शॉर्टसर्किट झाल्याने शहरबसला आग लागली. वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे जीवितहानी टळली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप येथे ही घटना घडली. चालकाच्या कॅबीनमध्ये ही आग लागली होती. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. शिवाय शेजारीच पेट्रोल पंप असल्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता होती. आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी बाहेर धाव घेतली. चालकही कॅबीनमधून बाहेर पडला. वेळीच आग आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्याची गरज पडली नाही. बसला आग लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या आगीत काही वायर जळाली आहेत. काही वेळाने ही बस दुरुस्तीसाठी नेण्यात आली.

बस न थांबवल्याने वाहकाला मारहाण
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी
थांबा नसतानाही बस का थांबविली नाही म्हणून वाहकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवाशाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. सय्यद समीर सय्यद सांडू असे या प्रवाशाचे नाव आहे. वाहक सखाराम पट्टेकर (वय ५३, रा. नेवासा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेवासा आगाराची औरंगाबाद-शिर्डी ही बस शिर्डीकडे जात होती. लिंबेजळगाव येथे बसला थांबा नाही असे असतानाही तेथे बस थांबवावी असे त्याचे म्हणणे होते. मात्र थांबा नसल्यामुळे बस थांबविण्यास पट्टेकर यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या समीर याने पट्टेकर यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांची कॉलर पकडून त्यांना बसच्या खाली ओढले आणि चापट बुक्क्य़ाने मारहाण केली.

विजेची तार पडून बैल दगावले
अंबड, ७ जून/ वार्ताहर
ताडहादगाव (ता. अंबड) शिवारात एका चालत्या बैलगाडीवर वीजप्रवाह असलेली विजेची तार पडून रावसाहेब विश्वनाथ हरिचंदे या शेतकऱ्याचे दोन बैल दगावले. ही दुर्घटना ६ जून रोजी (शनिवारी) सायंकाळी ६ वा. घडली. पोलीस ठाण्यात ७ जूनला घटनेची नोंद करण्यात आली.शनिवारी संध्याकाळी हरिचंदे हे आपल्या शेतातील काम आटोपून बनगाव रोडने बैलगाडीने घरी येत असताना शेतातून गेलेली विजेची तार तुटून गाडीसमोर पडली. तारेचा बैलाला धक्का बसून जागीच मरण पावले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून नोंद घेतली आहे.

खत साठेबाजीप्रकरणी विक्रेत्याचा परवाना रद्द
अंबड, ७ जून/वार्ताहर

शहापूर (ता. अंबड) येथील शेख हारून या खत विक्रेत्याने खताची साठेबाजी करण्याच्या हेतूने खताची विक्री न करता नावावर नोंदी केल्याप्रकरणी पंचायत समिती कृषी अधिकारी सुधाकर कराड यांनी खत विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. शहापूर येथील किमान कृषी सेवा दुकानाचे मालक शेख हारून यांनी गोदामात साठेबाजी करून खत ठेवले व खोटी बिले तयार करून जास्त किमतीस खत विक्री केली. हे कृषी अधिकारी सुधाकर कराड यांना समजताच त्यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकून दुकानाचा परवाना रद्द केला.

कृषी कर्ज देण्याची राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना
जालना, ७ जून /वार्ताहर
राष्ट्रीयीकृत बँकांनी शेती आणि पूरक व्यवसायासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा असे निर्देश संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी काल येथे केले. खरीप हंगामाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक अधिकारी तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.श्री. टोपे म्हणाले की, शेतीसाठी कर्ज उपलब्ध करवून घेण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्य़ाचा मुख्य व्यवसाय शेती असून जिल्ह्य़ाचे अर्थकारण त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीसाठी वीज, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांची बँकेत खाती उघडणे त्याचप्रमाणे महिला बचत गट आणि राजीव गांधी निवारा योजनेच्या लाभार्थ्यांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते सहकार्य करावे, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी या बैठकीत केल्या.

वटपौर्णिमा उत्साहात
परळी, ७ जून /वार्ताहर
‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ असे साकडे घालत आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनींनी वटवृक्षाचे पूजन केले. प्रभू वैद्यनाथ मंदिरासह जगमित्र नागा मंदिर, विठ्ठल रुख्मिणी व इतर मंदिरात महिलांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. वटपौर्णिमा या सणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या भक्ती आणि प्रेमाच्या शक्तीने सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत मिळविल्याची आख्यायिका आहे. सत्यवान -सावित्रीची कथा परळी पंचक्रोशीतच घडल्याचा अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. ‘वटसावित्री’ नावाने परिचित असलेल्या डोंगराच्या कुशीत ही कथा घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तर या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करतात.

गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
जालना, ७ जून /वार्ताहर

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान शाखेतून जालना जिल्ह्य़ात सर्वप्रथम आल्याबद्दल येथील जे. ई. एस. महाविद्यालयाची विद्यार्थिनी वर्षां विजय कुलकर्णी हिचा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. संजय राख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सुनील किनगावकर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. रावसाहेब देशपांडे यांची या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

प्रा. ठाले यांना एम.फिल. प्रदान
भोकरदन, ७ जून/वार्ताहर

येथील मोरेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक भाऊसाहेब ठाले यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून वाणिज्य विषयात नुकतीच एम.फिल. पदवी प्रदान करण्यात आली.
ठाले यांनी ‘सिल्लोड नगर परिषदेचे उत्पन्न आणि खर्च - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर डॉ. जगदेव आर. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव खासदार रावसाहेब पाटील-दानवे, प्राचार्य डॉ. डी. एस. कळंबे आदींनी अभिनंदन केले आहे.

उस्मानाबादमध्ये पावसाची जोरदार सलामी
उस्मानाबाद, ७ जून /वार्ताहर

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने आज (७ जून) उस्मानाबादेत दमदार सलामी दिली. तब्बल दीडतास मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.उस्मानाबादेत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजता रिमझिम पावसास सुरुवात झाली आणि त्यानंतर तब्बल दीड तास दमदार पाऊस झाला. या पावसाने नाल्या आणि ओढे भरून वाहिले. तर उस्मानाबादेत निर्माण झालेला तणाव या पावसाने काहीसा थंड केला.

चार नगराध्यक्षांची शुक्रवारी निवडणूक
जालना, ७ जून /वार्ताहर

जिल्ह्य़ातील जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन या नगरपालिकांच्या नूतन अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (१२ जून) निवडणूक होणार आहे. या चारही नगराध्यक्षांचा कार्यकाळ येत्या १९ जूनला संपणार आहे. जालना आणि परतूरचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित आहे. अंबडचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

आपद्ग्रस्तांना मदतीचे आज वाटप होणार - आमदार भोसले
जळकोट, ७ जून/वार्ताहर
वीज पडून जळकोट तालुक्यात विनोद शिंदे हा युवक ठार तर नारायण शिंदे व तुकाराम सोनकांबळे या व्यक्ती जखमी झाल्याची तसेच पाच शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना डोंगरकोनाळी (ता. जळकोट) येथे शनिवारी घडली. त्याचबरोबर घोनसी येथेही एक गाय मृत्यू पावल्याची घटना घडली. हे वृत्त कळताच उदगीरचे आमदार चंद्रशेखर भोसले यांनी उदगीरचे उपविभागीय अधिकारी संभाजी आडकुणे यांच्यासोबत या गावांना भेटी देऊन परिस्थिती पाहणी केली. तसेच आपद्ग्रस्त कुटुंबांना सर्व सोपस्कार पूर्ण करून उद्या (सोमवारी) शासकीय मदतीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही आमदार चंद्रशेखर भोसले यांनी दिली. यावेळी जळकोट पंचायत समितीच्या सभापती कांता नागरगोजे, कृषी उत्पन्न बाजा समितीचे सभापती धोंडीराम पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, माजी जिल्हा परिषद सदस्य उस्मान मोमीन यांनीही आपद्ग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पावसामुळे वीज कंपनीचे ३० लाखांचे नुकसान
वसमत, ७ जून/ वार्ताहर
शहरात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने वीज वितरण कंपनीचे अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाले. विजेचे अनेक खांब पडले. तर वीज तारा तुटल्यामुळे शहरातील वीजपुरवठा २० तास बंद होता. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम करीत असल्याची माहिती शहर अभियंता बी. एम. कल्याणकर यांनी दिली.शनिवारी अचानक शहरात व परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील वीज खंडित झाली. शहरातील मुंदडा कॉम्प्लेक्स, बहिर्जी नगर, अशोकनगर, रेल्वे स्टेशन, विवेक वर्धिनी शाळा, मुसाफरी मोहल्ला, कौटा शेड, पंचशील नगर, शहर पेठ, मोंढा परिसरातील विजेचे खांब जमिनीवर पडले, तर काही वाकले.

सहाव्या वेतन आयोगासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन
हिंगोली, ७ जून / वार्ताहर
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या हिंगोली शाखेच्या वतीने शिक्षणसेवक मानधनात वाढ, प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर सहाव्या वेतन आयोगातील अन्याय्य दूर करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करून निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांना दिले.राज्य शासनाने सन २००० पासून शिक्षण सेवक योजना सुरू केली आहे. तुटपुंज्या मानधनावर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक काम करतात. महागाईच्या निर्देशांकात वाढ झाली; परंतु मानधनात वाढ झाली नाही. ते सहाव्या वेतन आयोगानुसार वाढवावे, सहावा वेतन आयोग राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करावा, घरभाडेभत्ता, वाहनभत्ता लागू करावा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर एकनाथ कऱ्हाळे, मधुकर मोरे, शामराव जगताप, पंडित आवचार, हरिभाऊ मुटकुळे आदी स्वाक्षऱ्या आहेत. धरणे आंदोलन करणाऱ्यांनी निवेदन देऊन एक दिवसीय धरणे आंदोलन उठविले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचीच अनुपस्थिती
वसमत, ७ जून /वार्ताहर
तालुक्यातील हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने एकाच परिचारिकेवर या दवाखान्याचा कारभार चालत आहे. यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे.
हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर आहेत. त्यातील एक डॉक्टर काही दिवसांपासून रजेवर तर दुसऱ्या डॉक्टरही अनियमितपणे येत असल्याने आरोग्य केंद एका परिचारिकेवर चालत आहे. या केंद्रात औषधी, गोळ्या उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. डॉक्टर नसल्याने रुग्णांना नाईलाजाने खासगी दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. तरी जिल्हा आरोग्य केंद्राने याबाबत योग्य दखल घेऊन संबंधित डॉक्टरांना प्राथमिक केंद्रात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

‘पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी लक्षवेधी सूचना मांडणार’
जळकोट, ७ जून / वार्ताहर

लातूर जिल्ह्य़ातील जळकोट तालुक्यासाठी आवश्यक पशु वैद्यकीय दवाखाने आतापर्यंत मंजूर का झाले नाहीत? याबाबत विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याची माहिती हेरचे आमदार टी. पी. कांबळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.श्री. कांबळे, संभाजीराव पाटील निलंगेकर, एकनाथराव खडसे, बबनराव लोणीकर यां आमदारांच्या स्वाक्षरीने ही सूचना प्रधान सचिवांकडे पाठविली आहे. तालुक्यात माळहिप्परगा, रावणकोळा, मंगरुळ, सोनवळा या गावांत पशुवैद्यकीय नवे दवाखाने सुरू व अतनूर, घोनसी, वांजरवाडा येथे असलेल्या द्वितीय श्रेणीच्या दवाखान्यांचे प्रथम श्रेणीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे दोन वर्षांपूर्वीच पाठविण्यात आला आहे.