Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण
दुहेरी खुनाचा आरोप १४ जूनपर्यंत कोठडी, पद्म‘सिंह’ सीबीआयच्या पिंजऱ्यात
मुंबई, पनवेल, ७ जून / प्रतिनिधी / वार्ताहर

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी पाच तास कसून चौकशी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार पद्मसिंह पाटील यांना केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय)

 

शनिवारी रात्री उशिरा अटक केली. अटकेनंतर आज दुपारी पाटील यांना पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पाटील यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम १२०(ब) आणि ३०२ नुसार पवनराजे यांच्या हत्येचा कट रचून त्यांची व त्यांच्या चालकाची हत्या केल्याचा दुहेरी आरोप ठेवण्यात आला आहे.
पाटील यांच्या आदेशावरूनच पवनराजे यांची हत्या करण्यात आल्याचे तसेच त्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा प्रकरणातील सहआरोपी पारसमल जैन आणि सतीश मंदाडेने केल्यानंतर पाटील यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी उशिरा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पाटील यांना त्यांचा मुलगा आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री राणा जगजीतसिंह यांच्या मंत्रालय परिसरातील घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीबीआयच्या दक्षिण मुंबईतील मुख्यालयात पाटील यांना चौकशीसाठी नेण्यात आले. तेथे चार-पाच तास त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर लगेचच पाटील यांनी छातीत दुखत असल्याची आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यावर त्यांना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पनवेल येथील न्यायालयात हजर केले गेले. या वेळी सीबीआयचे वकील इजाज खान यांनी, पारसमल आणि डोंबिवली येथील भाजपचे नगरसेवक मोहन शुक्ल यांनी चौकशीत पाटील यांच्या आदेशावरूनच निंबाळकर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती दिल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच पाटील यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली. पाटील यांच्यावर निंबाळकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या वाहनचालकाची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले की, पाटील हे विद्यमान खासदार असून लोकसभेच्या नियमांनुसार त्यांच्या अटकेबाबतचा आणि प्रकरणाच्या तपासाबाबातचा अहवाल लोकसभेच्या सभापतींकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सभापतीच पाटील यांच्या अटकेची अधिकृत घोषणा तसेच तपासातील घडामोडींची माहिती देतील.
यापूर्वी सीबीआयने पारसमल जैन, दिनेश तिवारी, मोहन शुक्ल आणि सतीश मंदाडे अशा चौघांना अटक केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलेले असल्याचे बोलले जात आहे. निंबाळकर यांच्या मारेकऱ्यांपैकी दोघांचे उत्तर प्रदेशातील एका राष्ट्रीय राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध असल्याचेही सूत्रांनी सांगितले असून त्यासाठी सीबीआयचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अटकेतील आरोपी पारसमल जैन याच्या मुलीने गेल्याच आठवडय़ात सीबीआयच्या सहसंचालकांना एक पत्र लिहून निंबाळकर यांच्या हत्येच्या कटात माझ्या वडिलांसह आणखी सहाजण सहभागी असल्याचे कळविले होते. या पत्रात तिने पद्मसिंह पाटील यांचे नाव न घेता संशयित सहा जणांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याचे जे सध्या खासदार आहेत, असे सूचित करून संशयाची सुई पाटील यांच्या दिशेने वळवली होती.