Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उस्मानाबादमध्ये तणाव, ‘आयबीएन-लोकमत’च्या गाडीवर हल्ला
उस्मानाबाद, ७ जून /वार्ताहर

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात पद्मसिंहांच्या अटकेचे वृत्त धडकताच

 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज हिंसक आंदोलन सुरू केले. आज सकाळपासूनच त्यांनी ‘उस्मानाबाद बंद’चे आवाहन केले होते. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांना लक्ष्य केले आणि त्यानंतर त्यांनी वृत्तसंकलनासाठी उभ्या असलेल्या आयबीएन-लोकमत या मराठी वृत्तवाहिनीच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस दलाला सोलापूरहून राज्य राखीव दलाची एक तुकडी मागवावी लागली. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी दंगा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या २५ कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान, ‘आयबीएन-लोकमत’चे मुख्य संपादक निखिल वागळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून वाहनावर झालेला हल्ल्याचा मुद्दा आग्रहीपणाने उचलून धरला आहे. हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ९त्यांच्या वाहिनीवर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते व पुढाऱ्यांना या संबंधातील प्रतिक्रियेसाठी वाहिनीवर बोलाविले. परंतु बचावाच्या पवित्र्यात गेलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व त्यांचे कार्यकर्ते यांनी जेव्हा असे म्हटले की, पद्मसिंह पाटील हे त्यांच्या पक्षाचे आदरणीय नेते आहेत, तेव्हा वागळे यांनी राष्ट्रवादीच्या त्या सर्व कार्यकर्ते -नेत्यांना पुन्हा पुन्हा निंबाळकर खून प्रकरणामध्ये पक्ष अशा व्यक्तींचे समर्थन का करते, हे खोदून खोदून विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच त्यांच्याकडे नव्हती.राष्ट्रवादीचे नेते निरुत्तर झाल्याने निखिल वागळे यांच्या ‘इन्ट्रॉगेटिव्ह जर्नालिझम’ चे दर्शन घडले.