Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची शक्यता पवारांनी फेटाळली
नवी दिल्ली, ७ जून/वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नाही, असा निर्वाळा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पी. ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून त्यांना विरोध करीत काँग्रेसचा त्याग केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त

 

केल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार बोलत होते.
अर्थात संगमा यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नसल्याचे त्या भेटीनंतर स्पष्ट केले होतेच. सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दाही आता कालबाह्य झाल्याच्या संगमा यांच्या वक्तव्यावर मात्र पवारांनी मौन बाळगले. संगमा यांच्याप्रमाणेच पवार यांनीही सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता वर्तविणाऱ्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी दिल्या आहेत. त्या पवार यांनी फेटाळून लावल्या. आम्हाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती कायम राहील, असेही मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे काही नेते वेगळा सूर लावत असले तरी केंद्रीय नेतृत्वाची इच्छा आघाडीचीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्याद्वारे राज्यातील नेत्यांपेक्षा काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयालाच महत्त्व असल्याचे सूचित करणाऱ्या पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळेपण म्हणजे निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण असल्याचे नमूद केले! पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीनुसार आमच्या पक्षात निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले असून अशा विकेंद्रीकरणाद्वारेच नवे नेतृत्व विकसित होऊ शकते, असे पवार म्हणाले.