Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
दहशतवादी निसटल्याचा संदेश करकरे, कामटे, साळसकर यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही..!
कविता अय्यर/स्वाती खेर
मुंबई, ७ जून

२६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि निरीक्षक विजय साळसकर हे तीन अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. कामा इस्पितळाजवळील रंगभवनला लागून असलेल्या गल्लीत मुंबई पोलिसांच्या टोयाटो क्वालीस गाडीतच तिघांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर

 

संपूर्ण देशभर या दहशतवादी हल्ल्याच्या भयाची लाट पसरली.
या तीन अधिकाऱ्यांच्या हत्येआधी दोन तास जे जे घडले त्याचा बारीक-सारीक तपशील ‘इंडियन एक्स्प्रेस’ने गोळा केला आहे. करकरे, कामटे आणि साळसकर हे मृत्यूच्या दाढेत सापडण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यावर याद्वारे प्रकाशझोत पडला आहे. दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती एकमेकांना पुरविताना पोलीस दलात भीतीपोटी कसा गोंधळ झाला ते यावरून स्पष्ट होते. कामा इस्पितळाच्या ठिकाणी अतिरेक्यांची झालेली चकमक १५ मिनिटांपूर्वीच संपली आहे आणि दोन दहशतवादी त्याच मार्गाने निसटले आहेत, ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडे असूनसुद्धा ती हेमंत करकरे आणि त्यांच्या पथकापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे ते कामा इस्पितळाच्या दिशेने पुढे जात राहिले. रात्री १०.३० वाजता अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि त्यांचा बिनतारी संदेश यंत्रणा सहाय्यक (वायरलेस ऑपरेटर) हे मलबार हिल पोलीस ठाण्यातून बुलेटप्रुफ जॅकेट आणि कार्बाईन घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाकडे निघाले. १०.४५ वा. दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल हे दोघे ‘सीएसटी’वरील हल्ल्यानंतर कामा इस्पितळात पोहोचले. तासाभरापूर्वीच सीएसटी स्थानकात त्यांनी ५२ जणांना ठार केले होते. रात्री ११ वाजता कामा इस्पितळाच्या सुरक्षारक्षकाने मेट्रो सिनेमाजवळ सदानंत दाते यांची गाडी थांबविली आणि इस्पितळात गोळीबार झाल्याचे त्यांना सांगितले. ११ वाजून १० मिनिटांनी कामा इस्पितळाच्या प्रवेशद्वाराजवळ दाते यांना आणखी सहा पोलीस येऊन मिळाले.