Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाठदुखीमुळे उद्धव ठाकरे मुंबईला
शिवसैनिकांची घोर निराशा
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

 

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक पाठदुखीचा त्रास झाल्यामुळे ते मुंबईला औरंगाबादचा दौरा अर्धवट टाकून रवाना झाले. त्यांच्या उपस्थितीविना विजयी मेळावा झाल्यामुळे शिवसैनिकांची घोर निराशा झाली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघात हॅटट्रिक करण्याचा विक्रम नोंदविला. या विजयानिमित्त शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यांनी शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंबमध्ये आणि शनिवारी परभणीमध्ये जाहीर सभा घेतली होती. उस्मानाबाद, परभणी आणि औरंगाबाद या जिल्ह्य़ांचा दौरा त्यांनी मोटारीतून केला होता. औरंगाबादच्या सभेसाठी शनिवारी रात्रीच परभणीहून उद्धव ठाकरे हे शहरातील वेलकम समूहाच्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये उशिरा दाखल झाले. रविवारी सकाळपासूनच उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू झाला. मात्र अचानक दुपारी पाठीच्या वेदना वाढल्या. त्यांनी मुंबईतील आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत केली. डॉक्टरांच्या सूचनेनुसार सायंकाळी उद्धव ठाकरे हे मुंबईला खास विमानाने रवाना झाले. या पाठदुखीमुळे सकाळपासून शिवसेनेचे एक-दोन स्थानिक नेते वगळता उद्धव ठाकरे हे कोणालाही भेटले नाहीत.
या विजयी मेळाव्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली होती. औरंगाबाद शहर भगवाभय करण्यात आले होते. क्रांतीचौकातून उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या आगमनानिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र अचानक पाठदुखीमुळे उद्धव ठाकरे यांना मुंबईला जावे लागले. त्यामुळे विजयी मेळाव्यावर विरजन पडले. उद्धव ठाकरे यांच्याविना सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे हे उपस्थित होते.गोपीनाथ मुंडे हे भगवानगडावरून ताबडतोब औरंगाबादला दाखल झाले. मात्र ते शहरात येण्यापूर्वीच उद्धव ठाकरे हे मुंबईला रवाना झाले होते. ‘उद्धव ठाकरे आणि माझे बोलणे झाले आहे. त्यांची तब्येत अचानक ढासळली. त्यांच्या वेदना जास्त होत्या म्हणून त्यांना तपासणीसाठी मुंबईला जावे लागले.’’ अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी विजयी मेळाव्यात दिली.