Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ही रेष धावणारी

 

काल रविवार होता. कुणाकडेही जायचं नाही. ज्याला त्याला त्याच्या पद्धतीनं सुट्टी घालवायची असते. कुणाचे काही बेत असतात. कुणाचं काही ठरवलेलं असतं. कुठं गावाला जायचं असतं. गावाला जाणं रद्द करून दुसरे काही काम करायचं असतं. सोमवार ते शनिवार बऱ्याच गोष्टी मनातच खेळत असतात. निवांत आणि पुरेसा वेळ भेटत नाही म्हणून राहतात तशाच. रविवारी करूयात म्हणून बाजूला पडलेल्या असतात.
टेबल गच्चं भरलेला. पुस्तकं अस्ताव्यस्त. नंतर वाचूयात म्हणून काही विशेष पुरवण्या, अर्धवट वाचायची राहिलेली पुस्तकं. बाहेरच्या गेटवर कॉलबेलमध्ये काहीतरी गडबड आहे. बंद आहे. दोन-तीनदा बटण दाबूनही घरातून काहीही प्रतिसाद न आल्यानं शेवटी आवाज द्यावा लागतोय. पोस्टमनला माहीत झाल्यानं तो त्या बटणाच्या नादी लागत नाही. सरळ आवाज देतो. रविवार होता म्हणून काल ते एक काम होतं.
घरात अजून काय काय करायचं हे पाहिलं. फ्यूजचा बोर्ड ढिला झालेला. एका खिळ्यावरच त्यानं सारा भार टाकलेला. निखळून पडण्यासारखा, पण गुंतलेला. तिरकस झुकलेला. एक टय़ूबलाईट बऱ्याच दिवसांपासून बंद. पोर्चलॅम्पही बंद आहे. रात्री येता-जाता अंधार. बसमधल्या लाईटसारखा खालच्या बाजूनं छताला होता. कितीदाही ग्रीप्स टाकून बसवला तरीही काही दिवसांनंतर येतो काली. वाऱ्यावादळानं गळून पडायची भीती. मागं एक पडून फुटलाही. एवढय़ा वेळेस त्याच ठिकाणी बसवल्यानं ठोकून ठोकून तिथल्या खिळ्याची जागा झालीय अस्ताव्यस्त. फुटलीय. आता त्याच ठिकाणी ग्रीप टाकून खिळे बसवणं ठीक नाही. ड्रिलिंग मशीनच्या सहाय्यानं थोडं बाजूला नव्या ठिकाणी छिद्रं पाडायला हवीत. त्यानं मशीन आणली तर स्वयंपाकघरातही एक-दोन ठिकाणी छिद्रं पाडून घ्यायची होती. छोटं ताटघर लावायचं होतं. किचन ओटय़ाच्या बाजूला लायटर स्टॅण्ड, नॅपकिन रिंग बसवायचं होतं. हॉलमध्ये काही ठिकाणी. एक घडय़ाळ पडून किती दिवसांपासून. टिकटिक सुरू ठेवलेलं तसंच. भिंतीवर केव्हा लावतील याची वाट पाहत. पंचिंग आणि हातोडी घेऊन प्रयत्न करूनही शेवटी काही जमत नव्हतं. सीमेन्टचे खवले उडत. पुढे भिंतीच्या आतला अतिकठीण असा प्रदेश सुरू होईल. टणक झाल्या जागेतून वाळूचे खडे उडत. डोळ्यांत जायची भीती. कधी डाव्या हातातलं पंचिंग निसटून जाई किंवा उजव्या हाताला मुंग्या येईपर्यंत दणका बसे. खांद्यापर्यंत झणझणत जाई हात. प्लास्टरच्या वेळेस सतत लक्ष दिल्यानं आणि रात्रंदिवस भरपूर पाणी भिंतींना पाजल्यानं एवढी मजबुती आलेली असेल. छिद्र नाही पडत म्हणून खरं म्हणजे खूष व्हायला पाहिजे आपण. पण वैतागतो. छिद्र पडत नाही म्हणून नाराज होतो. यानं सांगितल्या वेळेपासून लाईटवाल्याची वाट पाहत बसलो. ड्रिलिंग मशीनही आणायला सांगितलं. चला म्हटलं रविवार कारणी लागेल. अर्धा तास झाला. एक झाला. मोबाईलवर बोललो तर साईटवरचं थोडंसं काम आटोपलं लगेच येत असल्याचं सांगितलं. बसलो पुन्हा वाट पाहत. ज्या गोष्टीचा भयानक कंटाळा येतो तीच करावी लागते. वाट पाहणं, प्रतीक्षेत अधांतर तरंगत राहणं ही सर्वात तापदायक बाब. दुसरं काही सुचत नाही. दुसऱ्या कामात लक्ष लागत नाही. बाहेर जाता येत नाही. वेळ जात राहतो. सुट्टी अशी जाते की काय नुसती वाट पाहण्यात असं वाटू लागतं. कंटाळा येऊ लागला. एका मित्राला भेटून यावं असं वाटलं. खूप दिवसांत भेट नव्हती. खरं तर रविवारी असं कुणाकडं नाही जावंसं वाटत. पण म्हटलं, इतर दिवशी दोघांनाही वेळ मिळत नाही. आज निदान भेट तरी होईल आणि फोन न करताच जायचं. अनपेक्षित भेटीच्या आनंदात मजा असते. सारं बाजूला सारून आपल्यात लगेच उतरण्यासाठी अधीर असेही काही असतात यार. तेवढा हक्कही असतो आपला. आपण मिळवलेला. गाडी काढली. लाईटवाला आला तर त्याला काय करायचंय सांगितलेलं आहेच. सूर्य माथ्यावर. चटचट लागणारं ऊन. त्याच्या घरासमोर थांबवली गाडी. दार बंद. खिडक्याही. उन्हाच्या वेळेला आराम करीत असेल. बाहेर उभा आहे, म्हणून सांगण्यासाठी मोबाईलवर सांगावं. पलीकडून त्याचा आवाज. तो बाहेरगावी गेलेला. तिथून बोलत होता. दोन दिवसानं परत येणारंय. म्हणजे अगोदर खरं म्हणजे खात्री करायला हवी होती. पुन्हा घरी परत. फक्त जाणं आणि येणं. शून्य काम. काम नव्हतंच म्हणा काही. पण विनाकारण महत्त्वाचं काम असल्यासारखं जाणं आणि येणं. परत घरी. अजूनही लाईटवाला नाहीच.
किती धावणे असे हे कुठे एक गाव नाही
नीज सावध कडय़ाला कशी मिळेल जराही! जेवण झालं. आता मनातले सारे आराखडे बाजूला सारूयात. हा येणार, तो येणार. त्याची भेट नाही. राहिलेली कामं. अजिबात विचार करायचा नाही. शून्य घ्यायचं एक मनात. निवांत आराम करायचा. पाठ टेकवली. छताचा गरगरता पंखा. डोळ्यांवर वाऱ्याच्या तरंगत्या लाटा. काही आतपर्यंत झिरपत. तळापर्यंत. शांत होत जाणारे डोळे. छानपैकी गुंगी. जड होत जाणारं शरीर. भांडय़ात पाणी ओतलं की ते फिरत राहतं. हलत राहतं. नंतर शांत होत जातं. त्यातले कण ना कण सर्वत्र फिरून हळूहळू तळाशी जाऊ स्थिरावतात. हे सारं होत नाही अचानक. एका लयीत, एका गतीत होत जातं सारं. अगदी ठप्प होणारा क्षण येण्यासाठी खूप करावी लागते प्रतीक्षा. नीज येते तश्0ाी. संथ श्वासांचं जहाज अंतरंगात तरंगत जात होतं. एकाएकी बाहेरून गलका कानावर आदळला. भांडय़ांचा आवाज. बायकांचा आवाज. पोरांचा आवाज. पाईप नीट लावण्याबद्दल दिलेली सूचना. टिल्लू मोटार सुरू झाल्याचा आवाज. ही अगदी लहान असल्यानं तिला तसं म्हणतात की काय कुणास ठाऊक. अचानक खडबडून साऱ्या देहानिशी हललो. नळला पाणी आलेलं होतं. काळवेळ काहीही ठरलेली नसते. आज दुपारी एकला. परवा रात्री अकराला आलं होतं. मुख्य रस्त्यावर एका बाजूला झाकलेला खड्डा आहे. त्यातला कॉक फिरवतो तो नगरपालिकेचा माणू बीडी ओढत ओढत सहज. त्याला वेळेचं, गरजेचं काही घेणं-देणं नसतं. दोन-तीन दिवसाला उगवलेला दिसतो. सायकलवर येतो. ‘टी’ आकाराचा लांब दांडय़ाचा पाना असतो त्याच्याकडं. डावीकडे फिरवतो. चार-पाच फेऱ्यांत पाणी सुरू होतं. लोखंडी झाकण लावतो. जातो निघून निर्विकारपणे. पुढे पाणी कुठं वाया जातंय, लिकेज आहे, उन्हाचे दिवस आहेत जास्त वेळ सोडावं, पावसाचे दिवस कमी सोडावं या हिशेबाशी त्याला नसतं काहीही घेणं-देणं. अंगात शक्ती संचारल्यागत धावपळ सुरू झाली. अर्धवट, उरलेलं शिळं पाणी, भराभरा काढणं. खरं तर पाणी तिकडं जलकुंभातही केव्हापासून साचवलं असतं. पाणी साठवलेल्या धरणातून सोडतात नदीला. नगरपालिका एके ठिकाणी पुन्हा अडवते. मोटारीने उपसा करून परत शहराच्या जलकुंभात. तिथून मग नळातून आपल्या घरात. शिळं म्हणू नये, ताजं म्हणू नये, पाणी ते पाणीच. एकाएकी कार्यक्रम सुरू झाला. भांडे रिकामे करणं. सारी एकच घाई. आपला सारा वर्तमानकाळ नळाशी जोडावा लागतो. ही वेळ हातातून सुटली की दोन-तीन दिवस अपुऱ्या पाण्यात आणि विवंचनेत मन पोहत राहतं. सारं ठरवूनही त्याप्रमाणं होतंच असं काही नाही. दिवस असा जातो कधी कधी. जसा कालचा गेला. आज सोमवार. कालचं काही आठवायचं नाही. आठवडा जाऊ द्यायचा असाच. पुन्हा रविवार. त्या दिवशी काहीही ठरवायचं नाही!