Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बसपाच्या प्रदेशाध्यक्षांसह तिघांना बेदम मारहाण?
पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप
औरंगाबाद, ७ जून /प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीत थेट पैसे घेऊन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आणि आता पदांसाठीही पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष विलास गरूड, उपाध्यक्ष सुरेश साखरे आणि कोषाध्यक्ष चांगदेव गायकवाड यांना बेदम मारहाण केली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या तिरुमला मंगल कार्यालय येथे ही घटना घडली.
कार्यकर्त्यांंचा संताप पाहून हे तिघेही पळून गेले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तर नांदेड आणि बीड येथील काही पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर केल्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. मात्र हाणामारी झाली नसल्याचे जिल्हाध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तिरुमला मंगल कार्यालयात आज ही बैठक होती. राज्यात जिल्हा पातळीवर नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर या बैठकीला विभागातील पदाधिकारी हजर होते.
लोकसभा निवडणुकीत या पक्षाला राज्यात कोठेच यश आले नाही. त्यावर चर्चा सुरू झाली. आमदार डॉ. के. के. सच्चान, गरूड आणि त्यांच्या चौकडीने पैसे घेऊन उमेदवाऱ्या वाटल्याचा आरोप करण्यात आला शिवाय आता पदे देण्यासाठीही पैशांची मागणी होत आहे. जो पैसे देत नाही. त्यांना पदावरून हटविण्यात येत आहे. चमचेगिरी करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे पक्षाध्यक्षा मायावती यांनी सांगितले असतानाही केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी उमेदवाऱ्या वाटण्यात आल्या आहेत. आताही आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा तसेच होण्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकारी संतप्त झाले. तुम्ही पक्ष संपवायला निघाले आहात, असा थेट आरोप करून काही कार्यकर्ते गरूड, साखरे आणि गायकवाड यांच्यावर चालून गेले.
अचानक काहीजण व्यासपीठाकडे सरसावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्षांना बेदम मारहाण केली. जिल्हाध्यक्ष मधुकर चव्हाण आणि अन्य स्थानिक कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढले आणि लगेच मोटारीत बसून ते अज्ञात स्थळी रवाना झाले. या प्रकारामुळे खळबळ उडाली.
दरम्यान गरूड, साखरे आणि गायकवाड यांना मारहाण झाल्याच्या वृत्ताचा चव्हाण यांनी इन्कार केला. नांदेड आणि बीड येथील पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात आल्याने त्यांनी गोंधळ घातला. गरूड आता येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असल्याचे त्यांनी सांगितले. गरूड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. या प्रकाराबद्दल पोलिसात नोंद झालेली नाही.