Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पोलिसांच्या अनास्थेमुळे सेवाभावी डॉक्टरांच्या मृतदेहाची सहा तास ससेहोलपट!
नांदेड, ७ जून/वार्ताहर

 

‘आधार’ हॉस्पिटलचे खऱ्या अर्थाने आधार असलेले तरुण डॉ. सुभाष मरळककर (वय ३४) यांना मृत्यूनंतरही शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा अनागोंदी कारभार व कामचुकार वृत्तीचा फटका बसला. पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार करण्यासाठी केलेली चालढकल यामुळे तब्बल सहा तास या डॉक्टराच्या पार्थिव रुग्णालयात पडून होते.
नांदेड शहरापासून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या मरळक येथील सुभाष मरळककर या तरुणाने स्वत:च्या बुद्धिमत्तेने व प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम असताना लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय पूर्ण करणाऱ्या डॉ. सुभाष मरळककर यांचा शनिवारी अपघातात मृत्यू झाला. नांदेड शहरात अल्पावधीत नावलौकिक मिळविणाऱ्या ‘आधार’ हॉस्पिटलचे ते खऱ्या अर्थाने ‘आधार’ होते. शांत स्वभाव, गावातील शिव मंदिरावर प्रचंड श्रद्धा, रुग्णांशी सुसंवाद साधण्याची कला, साधे राहणीमान, निरामय जीवनशैलीचा अंगिकार करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. नांदेड-वसमत रोडवर असलेल्या पळसगाव येथे शनिवारी डॉ. मरळककर यांची सॅन्ट्रो कार एका उभ्या मालमोटारीवर आदळली. या भीषण अपघातानंतर डॉ. मरळककर यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुलांना नांदेडच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉ. मरळककर यांना मृत घोषित करण्यात आले.
एका तरुण सहकाऱ्याला वाचविण्यासाठी शहरातल्या अनेक डॉक्टरांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती; परंतु नियतीला ते मान्य नव्हते. रात्री १२ वा. अश्विनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी डॉ. मरळककर यांच्या मृत्यूची माहिती नियमानुसार शिवाजीनगर पोलिसांना लेखी कळविली. निर्ढावलेल्या पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यास भाग्यनगर पोलीस ठाण्यात जा, असे म्हणून पिटाळून लावले. १२.३० च्या सुमारास हा कर्मचारी पत्र घेऊन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गेला. तेथील कर्मचाऱ्यांनी हे पत्र स्वीकारले व शिवाजीनगर पोलिसांना रुग्णालयात जाण्याचे सुचविले.
काही डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलिसांना लवकर येऊन कायदेशीर कारवाई पूर्ण करावी यासाठी अनेकवेळा साकडे घातले; परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या दौऱ्याचे कारण पुढे करून अधिकारी नाहीत, असे उत्तर देण्यात आले. पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या सहायक फौजदार तोटावाड यांनी आपल्याला लिहिता येत नाही, आपण जाणार नाही, अशी भूमिका घेतली. सूर्यवंशी नामक जमादार घरी जाऊन झोपले होते. तर पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या वसंत राठोड यांनी माझ्याकडे कागदपत्रे नाहीत म्हणून जबाबदारी झटकली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दाद देत नाहीत, दिवसभर बंदोबस्त करून थकलेले वरिष्ठ अधिकारी फोन उचलीत नाहीत असे लक्षात आल्यानंतर एका पत्रकाराने पोलीस नियंत्रण कक्षाचे प्रमुख फौजदार मुश्ताक गियासोद्दीन यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुश्ताक यांनी तात्काळ बिनतारी संदेशाद्वारे शिवाजीनगर पोलिसांना आदेश दिले आणि तब्बल पाच तास चालढकल करणारी यंत्रणा जागी झाली. पोलीस उपनिरीक्षक श्री. गपाट व त्यांचे सहकारी पोहोचल्यानंतर ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते कर्मचारी पोहोचले. पोलिसांची वाट पाहत शहरातील अनेक डॉक्टर रात्रभर ताटकळत बसले होते. रात्री १२ वा. कळविल्यानंतर ५.३० वा. पोलीस आले आणि ६ वा. डॉ. मरळककर यांचा पार्थिव शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.
एका प्रथितयश, तज्ज्ञ डॉक्टरच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडण्यासंदर्भात दाखविलेली अनास्था अनेकांच्या जिव्हारी लागली. संपूर्ण घटनाक्रम, पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्षातल्या स्टेशन डायरीतील नोंदी वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर ते आता कोणती भूमिका घेतात की गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य चुकांवर पांघरूण घालण्यातच धन्यता मानतात, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.