Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आघाडीच्या कारकीर्दीत कायद्याचे राज्यच नाही -गोपीनाथ मुंडे
औरंगाबाद , ७ जून /खास प्रतिनिधी

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीत कायद्याचे राज्य शिल्लक राहिलेले नाही , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती सत्तेवर येण्यासाठी कटीबद्ध आहे , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या वतीने येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मुंबईला रवाना व्हायचे होते म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी अवघी सात मिनिटे भाषण केले. या वेळी संयोजकांच्या वतीने औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे , जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमच लोकसभेवर निवडून गेलेले गोपीनाथ मुंडे यांनाही या वेळी सन्मानीत करण्यात आले. या वेळी औरंगाबादच्या मतदारांचे आभार मानताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यासपीठावर लोटांगण घातले. केंद्रात काँग्रेसची सत्ता आहे. राज्यातील सत्ताही काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. या आघाडी सरकारने आपला शेवटचा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत मांडला. सामान्य माणसाला या अर्थसंकल्पात स्थान नसल्याची टीका गोपीनाथ मुंडे यांनी केली. राज्यातील ग्रामीण भागामध्ये आजही १८ ते १९ तास वीज मिळत नाही. राज्यावर १ लाख ९८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्याचा विकास करण्याऐवजी भकासपणा त्यांनी केला आहे ; त्यामुळे राज्य पाठीमागे पडले आहे. महाराष्ट्राच्या ५० वर्षांच्या इतिहासात शिवशाही ही सर्वात चांगली राजवट असल्याचा दावाही गोपीनाथ मुंडे यांनी केला. नवीन परिवर्तन घडविण्यासाठी शिवसेना-भाजप युती कटीबद्ध आहे. त्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे , असे आवाहनही त्यांनी केले.
औरंगाबादसाठी दोन नव्हे तीन खासदार
खासदार चंद्रकांत खैरे यांनी हॅटट्रिक करून विक्रम नोंदविल्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन गोपीनाथ मुंडे यांनी केले. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या यशामागे औरंगाबाद जिल्ह्य़ाचा वाटा आहे. औरंगाबादच्या विविध प्रश्नांसाठी हे दोन खासदार भांडतीलही. औरंगाबादसाठी दोन नव्हे तर तीन खासदार आहेत. मीही औरंगाबादचे प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.