Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मराठवाडय़ाच्या शैक्षणिक विकासात म्हैसेकर यांचे योगदान दिशादर्शक - अशोक चव्हाण
नांदेड, ७ जून/वार्ताहर

 

मराठवाडय़ाच्या शैक्षणिक विकासात प्राचार्य गो. रा. म्हैसेकर यांनी दिलेले योगदान सदैव दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे काढले.
प्रा. म्हैसेकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी. लिट. ही सन्मान्य पदवी व मानपत्र अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. विद्यापीठ परिसरात परंपरागत पद्धतीने पार पडलेल्या या विशेष दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे होते.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या छापील भाषणात शिक्षण क्षेत्राची आजची स्थिती व उद्याची दिशा तसेच त्यामधील राज्य सरकारची भूमिका यावर मौलिक विवेचन केले. पण तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रा. म्हैसेकर यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्याचा आदरपूर्वक गौरव केला.
ते म्हणाले की, प्रा. म्हैसेकर यांनी तरुण वयात हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग नोंदवून आपल्या सार्वजनिक जीवनाची पायाभरणी केली. ते १९६३ साली नांदेडला प्राचार्य म्हणून आले आणि मग त्यांनी यशवंत कॉलेजला शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून पुढे आणले. अन्य शैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या या शिक्षणतज्ज्ञाला डी. लिट. ही सन्मान्य पदवी प्रदान करता आली, हे मी माझे भाग्य समजतो. शिक्षणाशिवाय शेती, आरोग्य, पाणी, वीज या ग्रामीण विकासाशी प्रश्नांतही म्हैसेकर यांनी रस दाखविला. खासदार व कुलगुरू या पदांवर काम करताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत पारदर्शक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. निमसे यांनीही म्हैसेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. त्यांचा हा गौरव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सत्प्रवृत्तीचा गौरव असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. तत्पूर्वी श्री. म्हैसेकर यांनी या सन्मानाबद्दल सर्व संबंधितांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्य समारंभापूर्वी मुख्यमंत्री, कुलगुरू, गौरवमूर्ती व विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य दीक्षान्त मिरवणुकीने समारंभस्थळी आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. सातारकर यांनी, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. राम वाघ यांनी केले.