Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अपंग विनोद कागदेच्या नशिबी लालफितीमुळे प्रचंड हाल
कळंब, ७ जून/वार्ताहर

 

अधिकारी आणि एजंट यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे असंख्य बोगस लाभार्थ्यांना शासनाचा फायदा होतो; परंतु ज्यांना खरोखरच शासकीय योजनेची गरज आहे अशांना मात्र या फायद्यापासून वंचित राहावे लागते. यामधून सर्वसामान्य अपंग व्यक्तीही सुटलेल्या नाहीत. मरण येत नाही म्हणून जगायचे, अशी अवस्था दहिफळ (ता. कळंब) येथील १०० टक्के अपंग असलेल्या विनोद कागदे या तरुणाची झाली आहे.
१०० टक्के अपंग असलेला विनोद कागदे हा अंथरुणावरच असतो. त्याला उठता-बसताही येत नाही. जिवंत असून मेल्यासारखे जीवन तो जगत असून घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील मोलमजुरी करतात. दिवसभर घरातच ठेवून जाण्याशिवाय पर्याय नाही. शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी या कुटुंबाने ३० जून २००५ ला कळंबच्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कागदपत्र दाखल केले. कर्मचाऱ्यांनी ही कागदपत्रे गहाळ करून अपंगाची चेष्टा केली. पुन्हा आई-वडिलांनी कागदपत्रांची जमवाजमव करून दुसऱ्यांदा दाखल केली, तर कर्मचाऱ्यांनी हा मुलगा खराच अपंग आहे का, याची विचारणा करून त्याला समोर आणावयास सांगितले. उठवा-बसताही येत नसलेल्या विनोदला दहिफळहून कळंबला कसे आणायचे, हा प्रश्न कुटुंबापुढे होता, पण नाईलाज होता. त्याला एका टमटममध्ये झोपवून तहसील कार्यालयात आणून अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर तरी आपल्याला शासकीय मदत मिळेल अशी आशा कुटुंबाला होती; परंतु कमिटीचे अध्यक्ष आमदार दयानंद गायकवाड यांना लोककल्याणकारी योजनेचा फायदा गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी वेळ नसल्याने याची बैठक झाली नसल्याचे तहसील कार्यालयाचे कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे या अपंग विनोदचे नशीब अंधारातच आहे. खरोखर अपंग असताना याचा लाभ त्याला अद्यापही मिळू शकलेला नाही. घरातील अठराविश्व दारिद्य््र असतानाही या मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडील शिवाजी व आई अविदा हे अहोरात्र कष्ट करीत आहेत.