Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बीडमध्ये वीज पडून चार ठार,चार जखमी
बीड, ७ जून/वार्ताहर

 

जिल्ह्य़ात शनिवारी आठ ठिकाणी वीज पडून चारजण मृत्युमुखी पडले तर तीन जनावरे ठार झाली. चौघेजण जखमी झाले. जोराच्या वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले.
जोराच्या वाऱ्यासह ६ जूनला दुपारनंतर पावसाचे आगमन झाले. यात सायंकाळच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील छत्र बोरगाव येथे लिंबाच्या झाडावर वीज पडून उद्धव अश्रुबा गाडेकर (वय ४८) व बळीराम यशवंत गायकवाड (वय ४२) यांचा भाजून मृत्यू झाला. तर थेरला (ता. पाटोदा) येथील वैशाली सर्जेराव माने (वय २३) ही महिला वीज पडून ठार झाली. बनकारंजा (ता. केज) येथेही शेतात वीज पडून विजय महादेव दहिरे (वय २३) हा ठार झाला. तर उमरी येथे राजश्री सौदागर आणि जिवाजीवाडी येथे तारामती महादेव राऊत ही महिलाही वीज पडल्याने जखमी झाली. टाकळी येथे घरावरील पत्रे उडाल्याने दगड पडून ज्ञानोबा घुगे (वय ६५) व नानुबाई घुगे (वय ६०) हे वृद्ध जोडपे जखमी झाले.
दहिफळ कडताकळी येथेही वीज पडली. यात महादेव पंढरी नेबडे यांची एक गाय तर तांबासजुरी (ता. बीड) येथे किशोर अमनी नेमाने यांची म्हैस आणि कैवडगाव (ता. केज) येथे प्रकाश भानुदास पवार यांचा बैल वीज पडून ठार झाला.
तब्बल आठ ठिकाणी वीज पडून जीवितहानी झाल्याची घटना घडली. तर ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरील पत्रे उडून आणि शेतातील झाडे उडून मोठे नुकसान झाले आहे. तालुका तहसील प्रशासन घटनांचे पंचनामे करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.