Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गटसचिवांचा संप मिटल्याने आजपासून कर्जवाटप सुरू
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

 

वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील सर्व गटसचिवांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील गटसचिवांनी २५ मे पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन केले होते. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांनी गटसचिवांचा प्रश्न सोडविला. नवीन तोडगा काढण्यात आला. पगार व नोकरीची निवृत्त होईपर्यंत शाश्वती दिल्याने गटसचिवांनी आपला संप शनिवारी मागे घेतला. या संपामुळे आता शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभा अध्यक्ष आणि सहकारमंत्री यांच्या उपस्थितीत राज्यातील गटसचिवांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गटसचिवांच्या संपूर्ण मागण्या मान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. नाबार्डशी झालेल्या सामंजस्य करारामुळे व कायद्यातील बदलामुळे गटसचिवांच्या सेवाविषयक बाबींसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६९ (ख) ची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समिती व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सचिवांचे सेवा व वेतन विषयक बाबींचे नियंत्रण जिल्हास्तरीय समितीकडे द्यावे व त्याविषयीचा सविस्तर प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्यात यावा, असे गटसचिव संघटना आणि सहकार आयुक्त यांच्यात ४ जूनला झालेल्या चर्चेत ठरले. त्यामुळे सहकार आयुक्तांनी ७ व २९ एप्रिलला प्रसिद्ध केलेली परिपत्रके स्थगित करावीत, अशी मागणी करण्यात आली. सहकार आयुक्तांचा प्रस्ताव आल्यानंतर शासन त्यावर निर्णय घेईल. त्यामुळे ही परिपत्रके स्थगित करण्यात आल्याचे विशेष कार्य अधिकारी चं.ज. देशपांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
गटसचिवांच्या संपामुळे कर्जवाटपाचे काम ठप्प झाले होते. गटसचिव हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांना पतपुरवठय़ाची भूमिका बजावणारा आहे. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांनी नाबार्डशी चर्चा करून गटसचिवांच्या सेवाविषयक बाबींसाठी योग्य तो बदल करणे अनिवार्य आहे हे निदर्शनास आणून दिले. गटसचिवांची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारलेली असून त्यामुळे गटसचिवांच्या नोकरीची हमी त्यांना मिळाली आहे. सर्व गटसचिवांनी पूर्ववत काम सुरू करून कर्जवाटप सुरू केल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. ए. गोराडे आणि प्रसिद्धीप्रमुख आर. बी. काळे पाटील यांनी दिली.