Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सुटीच्या महिन्यात ‘सिद्धार्थ’ला साडेचार लाखांचे उत्पन्न
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी

 

कडक ऊन आणि तितक्याच उकाडय़ामुळे औरंगाबादकरांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. वीज कपातीमुळे घरात बसणेही असह्य़ झाल्याने सिद्धार्थ उद्यानातील झाडांच्या सावलीत विसावणे हाच पर्याय होता. मे महिन्यात सुमारे लाखभर लोकांनी सिद्धार्थ उद्यानाला भेट दिली असून यामुळे पालिकेच्या तिजोरीत साडेचार लाख रुपये गोळा झाले आहेत. महिन्याला सरासरी तीन लाख रुपये जमा होतात. या महिन्यात त्यात ५० टक्के वाढ झाली आहे.
सिद्धार्थमध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात येते. एप्रिल महिन्यात पालिकेच्या तिजोरीत ३ लाख ४१ हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतरच्या मह्य़िात तब्बल एक लाख रुपयांनी महसुलात वाढ झाली असल्याचे संचालक डॉ. जे. एम. भडके यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या जून महिन्याच्या प्रारंभी उद्यानातील गर्दी कायम असली तरी पावसानंतर गर्दी आणि आपोआपच महसूलही कमी होणार हे नक्की आहे.
गेल्या काही वर्षांपर्यंत उद्यानात प्रवेशासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येत नव्हते. त्यामुळे उद्यानावर होणाऱ्या खर्चाची वसुली होत नव्हती शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे दुपारी कोणीही येऊन येथील झाडाखाली मस्तपैकी ताणून देत होते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते.
त्यामुळे अन्य शहरांप्रमाणेच येथेही प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात यावे, अशी सूचना भडके यांनी केली होती. त्यानुसार तीन वर्षांपासून येथे प्रवेशासाठी तीन रुपये शुल्क आकारण्यात येते. या उद्यानावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत येणारा महसूल हा कमी असला तरी आतापर्यंत येथून एक छदामही पालिकेला मिळत नव्हता.
उद्यान तसेच प्राणिसंग्रहालाच्या प्रवेशासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. साधारणपणे उद्यानात आलेले बहुतांश पर्यटक हे प्राणिसंग्रहालयाला भेट देतातच. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाचेही उत्पन्न या बरोबरीचे असण्याची शक्यता आहे. प्राणिसंग्रहालयाच्या उत्पन्नाचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.