Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जखमी बैल व मालकाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश
औरंगाबाद, ७ जून /खास प्रतिनिधी

 

जखमी बैल व त्याच्या मालकास साडेसात टक्के व्याजासह २५ हजार १५४ रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधीकरणाचे अध्यक्ष यू. के. हनवते यांनी वाहनचालक, मालक व रिलायन्स जनरल इन्शुरन्सला दिले आहेत. हे प्रकरण ७ महिने सात दिवसांत निकाली काढण्यात आले.
१६ जुलै २००८ ला सायंकाळी दौलताबादचे शेख आरेफ शेख अकबर हे आपल्या मालकीचे दोन बैल, भाऊ शेख अफजलसह शेताकडे जात होते. साईनाथ हॉटेलसमोरून पायी जाताना मारुती व्ॉगन आर मोटारीने एका बैलाला दिलेल्या धडकेने बैलाच्या पायास गंभीर जखम झाली. बैलाचा मागील उजवा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर होऊन अपंगत्व आले. शेख आरेफ शेख अकबर यांनी वाहनचालकाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोटार अपघात न्यायाधीकरणाकडे १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची विनंती केली. मोटारचालक महेंद्रसिंग चंडोल, मालक सुखदीपसिंग अरजानी व रिलायन्स विमा कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले. बैलाच्या कामातून १५ हजार महिना मिळत होता. यातून अर्जदार कुटुंबाची देखभाल करीत होता. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अफजल यांचीही साक्ष नोंदविण्यात आली.
यामध्ये अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले. यामुळे शेत पडीक ठेवावे लागले. कर्जही घ्यावे लागले. अर्जदारास साडेसात टक्के व्याजासह २५ हजार १५४ रुपये द्यावेत, असा आदेश न्यायाधीकरणाचे अध्यक्ष यू. के. हनवते यांनी दिला.
अर्जदारातर्फे अ‍ॅड. संदीप बी. राजेभोसले यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. संदीप गोरे, समृद्धी देशमुख यांनी सहकार्य केले. प्रतिवादीतर्फे अ‍ॅड. बियाबानी, रिलायन्सतर्फे अ‍ॅड. आर. एच. दहाड यांनी काम पाहिले.