Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्राहक पंचायत छेडणार चिनी वस्तूंविरुद्ध मोहीम
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी

 

चिनी वस्तू स्वस्त असतात त्यामुळे ग्राहकवर्ग त्याकडे लवकर आकर्षित होतो. मात्र त्या वस्तूंमुळे होणारे धोके फार कमीजणांना माहीत आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आता चिनी वस्तू खरेदीविषयी जनजागृती मोहीम छेडणार आहे.
चिनी खेळणी या देशी खेळण्यांपेक्षा कितीतरी स्वस्त असतात खऱ्या, मात्र त्यामुळे अपाय होऊ शकतात, हे फार कमीजणांना माहीत आहे. शाळा, महाविद्यालय या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व्याख्याने आयोजित करून जागरूकता मोहीम छेडणार आहे. शिवाय ज्या ग्राहकांना चिनी वस्तूंमुळे धोका झाला आहे त्यांना न्यायालयात दाद मागण्याविषयीचेही मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती पंचायतीचे दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांनी दिली.
मिनरल पाण्याचे अवास्तव दर ग्राहकांना वेठीस धरण्याचा एक प्रकार असून शुद्ध बाटलीबंद पाण्याचे दर हे वाजवी असावे, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतची आहे. त्यासाठी पंचायत सर्व प्रशासकीय यंत्रणेला पिण्याचे पाणी मोफत पुरविण्याचे आवाहन करणार आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक पंचायतीचा जलक्षेत्र निजीकरणाला विरोध आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व नंतर उद्योगासाठी हा क्रम सर्वमान्य असताना राज्य शासनाने पिण्यासाठी, उद्योगासाठी आणि नंतर शेतीसाठी पाणी असा क्रम लावला आहे. त्याला आपला विरोध दर्शवीत भविष्यात राज्य शासनाने केंद्राप्रमाणे जलनीती अमलात आणावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेच्या ठरावात करण्यात आली. यावेळी सचिव अरुण देशपांडे, प्राध्यापक प्रभाकर वाघमारे, शांताराम देशपांडे, हेमंत कद्रे, सुधीर पाटील, अण्णा वैद्य आदींची उपस्थिती होती.