Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एकजुटीने न्यायालयीन लढा देण्याचा अस्थायी बजाज कामगारांचा निर्धार
१५२५ कामगारांची न्यायालयीन लढाई
औरंगाबाद, ७ जून/खास प्रतिनिधी

 

औद्योगिक न्यायाधीकरणात बजाजच्या अस्थायी कामगारांचा न्यायालयीन लढा एकजुटीने लढण्याचा निर्धार राज्यातील काही बजाज कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आला.
बजाजच्या अस्थायी कामगारांचा मेळावा नुकताच म्हाडा कॉलनीमध्ये झाला. या मेळाव्याला १५२५ अस्थायी कामगार उपस्थित होते. १५२५ कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात बजाज व्यवस्थापनाविरोधात २००४ मध्ये प्रकरणे दाखल केली होती. हे प्रकरण कामगार उपायुक्तांनी औद्योगिक न्यायाधीकरणाकडे वर्ग केले. बजाज व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र बजाज कंपनीने २९ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण मागे घेतले. त्यामुळे बजाज कंपनीतून काढून टाकलेल्या १५२५ अस्थायी कामगारांचा न्यायालयीन लढाईचा मार्ग मोकळा झाला.
औद्योगिक न्यायाधीकरणात देण्यात येणाऱ्या कामगारांच्या न्यायालयीन लढय़ाबाबत कामगारांची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी कामगारांना या मेळाव्यात सांगण्यात आली. या मेळाव्यात अ‍ॅड. संदीप बी. राजेभोसले यांनी मार्गदर्शन केले.
सर्व कामगारांनी एकजुटी कायम ठेवून न्यायालयीन लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्याला संघटनेचे अध्यक्ष अशोक खोसरे, उपाध्यक्ष भारत तांगडे, सचिव भाऊसाहेब तांगडे, संतोष धायवट, पोपट वेताळ आदी उपस्थित होते.