Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आयुक्तांचा अभियंत्यांवर अविश्वास?
तांत्रिक कक्षाची पुन्हा स्थापना
औरंगाबाद, ७ जून / प्रतिनिधी

 

प्रत्येक कामाच्या तांत्रिक तपासणीसाठी औरंगाबाद पालिकेत पुन्हा एकदा तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याकरीता एका उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात आली असून, अभियंत्यांनी निश्चित केलेल्या कामाची तपासणी एक उपअभियंता करणार असल्यामुळे आयुक्त वसंत वैद्य यांनी कार्यकारी अभियंत्यांवर अविश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होत आहे.
१९९७ मध्ये तत्कालीन आयुक्त डी. एन. वैद्य यांनी या कक्षाची स्थापना केली होती. तेव्हाही उपअभियंता काजी मोहियोद्दीन यांचीच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. २००४ पर्यंत हा कक्ष अस्तित्वात होता. नंतर तो बंद झाला. आता पुन्हा एकदा हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. मोहियोद्दीन यांच्याबरोबरच दोन कनिष्ठ अभियंते, एक लिपीक आणि शिपाई असे कर्मचारी देण्यात आले आहेत.
विकास काम सुरू होण्याच्या पूर्वीपासून नंतर ते पूर्ण होण्यापर्यंत या विभागाचे त्याकडे लक्ष असणार आहे. प्रत्येक प्रभाग तसेच कार्यकारी अभियंत्यांकडून होणाऱ्या कामावर या विभागाचे लक्ष असणार आहे. त्यामुळे हा कक्ष म्हणजे कार्यकारी अभियंत्यांवर अविश्वास असल्याचे बोलले
जात आहे.
उद्या (सोमवार) पासून हा विभाग कार्यरत होणार आहे. कार्यकारी अभियंत्यांवर हा अविश्वास असल्याचे बोलले जात असले तरी या कक्षाच्या स्थापनेला कोणाचाही विरोध होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. कामावर लक्ष ठेवण्याबरोबरच काही चुका झाल्या तर या विभागालाही जबाबदार धरण्यात येईल का असा प्रश्न आहे. या विभागालाही जबाबदार धरण्यात येणार असेल तर ते सर्वासाठीच चांगले आहे. या विभागामुळे सर्वच कामावर नियंत्रण राहील, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.