Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पंकजाताई पालवे यांचा आजपासून आभारदौरा
परळी, ७ जून /वार्ताहर

 

बीड लोकसभा मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विजय झाल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या युवा नेत्या पंकजाताई पालवे - मुंडे या सोमवार (८ जून) पासून बीड जिल्ह्य़ात आभार दौरा करणार आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात खासदार गोपीनाथ मुंडे यांचा विजय महाराष्ट्रात क्रमांक एकचा ठरला आहे. खासदार मुंडे हे विक्रमी मताने विजयी झाल्यामुळे भाजपा-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा विजय उत्सव साजरा केला. खासदार मुंडे यांच्या विजयात भाजपा-सेना युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वाटा तर आहेच; परंतु ही निवडणूक बीड जिल्ह्य़ातील जनतेनेच हातात घेतल्यामुळे खासदार मुंडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. या निवडणुकीत विरोधकांनी खासदार मुंडे यांच्या विरोधात अनेक डाव रचले होते. परंतु जिल्ह्य़ातील जनतेचे सर्वमान्य नेते म्हणून खासदार मुंडे यांची ओळख झाल्यामुळे विरोधकांना चारी मुंडय़ा चीत करण्यात ते यशस्वी झाले. जिल्ह्य़ातील मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी खासदार मुंडे यांच्या वतीने त्यांच्या कन्या पंकजाताई पालवे यांनी पहिल्या टप्प्यात ८ व ९ जूनला माजलगाव व केज मतदारसंघात आभार दौरा निश्चित केला आहे.
पंकजाताई पालवे या ८ जूनला माजलगाव मतदारसंघातील माळेवाडी येथून सकाळी ८.३० पासून आपला आभार दौरा चालू करणार आहेत. या अंतर्गत १० वाजता मंजरथ, ११ वाजता गंगामसला, दुपारी १२ वाजता मोटेवाडी, दुपारी ३ वाजता खरात आडगाव, सायंकाळी ५ वाजता उमरी, सायंकाळी ६.३० वाजता लवूळ नं. १ व सायंकाळी ८ वाजता बाबी तांडा येथे तर ९ जूनला केज मतदारसंघात सकाळी ९ वाजता बनसारोळा, १० वाजता जवळबन, ११ वाजता यूसुफ वडगाव, दुपारी १२ वाजता चिंचोली माळी, दुपारी ४ वाजता काळेगाव, सायंकाळी ५ वाजता नांदूरघाट, सायंकाळी ६ वाजता दहीफळ, सायंकाळी ७ वाजता विडा, रात्री ८ वाजता कानडीमाळी येथे दौरा करून रात्री ९ वाजता होळ येथे मतदारांच्या भेटीने दौऱ्याचा समारोप करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गयाबाई कराड, जि.प. अध्यक्षा मीराताई गांधले, भाजपाचे प्रदेश सदस्य रमाकांत मुंडे, जि.प. सदस्य बजरंग सोनवणे, केज तालुकाध्यक्ष संजय पाटील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.