Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

केकेएम कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
मानवत, ७ जून /वार्ताहर

 

विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अर्थसाह्य़ातून बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचे येथील के. के. एम. महाविद्यालयाच्या परिसरात गुरुवारी (४ जून) पाथरी तालुका शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. द्वारकादासजी लड्डा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सुमारे ४५ लाख रुपये खर्चाच्या सर्व सुविधायुक्त मुलींच्या वसतिगृहासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने या महाविद्यालयासाठी नुकतेच ४० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यानुसार संस्थेने हे बांधकाम तातडीने हाती घेतले असून या कामाचे भूमिपूजन डॉ. लड्डा यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सहसचिव अनिलराव नखाते, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. नागुलालजी सोनी, विजयकुमार दलाल, दिलीप हिंबारे, संजय बांगड, अ‍ॅड. दिगंबर बारटक्के यांच्यासह आडत व्यापारी संजयकुमार लड्डा, नितीन कत्रुवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश समदाणी, उपप्राचार्य डॉ. अशोक चिंदूरवार व इतर महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या मुलींच्या वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थिनीसाठी महाविद्यालय परिसरात राहण्याची सुविधा मिळणार असल्याने तालुक्यातील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.