Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वसमत नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु
वसमत, ७ जून /वार्ताहर

 

वसमत पालिकेच्या अध्यक्षपदासाठी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील विद्यमान नगरसेवक यांची बैठक औंढा येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच झाली. या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती संदर्भात चर्चा झाली.
येत्या १६ जूनला नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून होत आहे. त्यामुळे या पदासाठी दावेदार असणाऱ्या सदस्याच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष कोण? अशी चर्चा शहरात आहे.
वसमत नगराध्यक्षपदाची जागा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसच्या मनीषा विजय कडतन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमा सुभाष लालपोतू व इंदिराबाई साखरे, शिवसेनेच्या ताराबाई प्रकाश भोसले तर भाजपच्या सुषमा शिवदास बोड्डेवार या त्यापदासाठी दावेदारआहेत. काँग्रेस ८, राष्ट्रवादी काँग्रेस ६, शिवसेना ६, भाजपाचे ४ तर एक अपक्ष सदस्या असे पालिकेतील पक्षांचे बळ आहे.
या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती घडून आली तर काँग्रेसच्या मनीषा कडतन यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडू शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली तर ते शक्य होऊ शकते. उपनगराध्यक्षपदासाठीही काही नगरसेवक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे रियाज कुरेशी, मसरूर पठाण यांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
वसमत नगराध्यक्षपदाची निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यामध्ये आजी व माजी सहकारमंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर पालिकेत काँग्रेसचे संख्या बळ जास्त असल्याने माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अब्दुल हाफीज हे राष्ट्रवादी सोबत युती करण्याच्या तयारीला लागले. त्यामुळे या वेळी काँग्रेससोबत युती करण्यासाठी स्वत:हून सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर जातीने लक्ष देत आहे. सेना-भाजप हे एकत्र येऊनसुद्धा व अपक्ष पक्षाला घेऊनही आपले बहुमत सिद्ध करू शकत नाही. पण त्या पूर्वीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीचे बहुमत असताना ऐन निवडणुकीच्या वेळी सभागृहात राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक गैरहजर राहून एक प्रकारे सेना-भाजपला पाठिंबा दिला व सेनेचे सुनील काळे हे नगराध्यक्ष झाले. त्यावेळी सुद्धा सहकार राज्यमंत्री दांडेगावकर यांनी आपल्या सहाही नगरसेवकांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते. पण त्या तीन नगरसेवकांनी त्यांचा आदेश धुडकावून सभागृहात गैरहजर राहिले.
या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक निश्चित काँग्रेसला पाठिंबा देईल असे आश्वासन पुन्हा दांडेगावकर यांनी काँग्रेसला दिले आहे. दुसरीकडे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा व भाजपचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवदास बोड्डेवार हे दोन मुरब्बी राजकीय नेते पुन्हा राजकीय खेळी खेळून राष्ट्रवादी नगरसेवक
कसे फोडता येईल याची व्यूहरचना करीत आहेत.
यंदा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी हे कुठवर यशस्वी होतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.