Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गॅस्ट्रोच्या साथीमध्ये दोघांचा बळी उमरगा तालुक्यात १०० जणांना लागण
उमरगा, ७ जून / वार्ताहर

 

उमरगा तालुक्यातील जकेकूर गावात गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे दोनजणांचा बळी गेला असून गेल्या तीन दिवसांत १०० जणांना याची लागण झाली आहे.
जकेकूर गावात दोन पाण्याच्या टाक्यांमधून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विहीर व बोअरच्या माध्यमातून या दोन टाक्यांत पाणी सोडले जाते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्याने अनेक नागरिकांना संडास व उलटय़ांचा त्रास होऊ लागला. शुक्रवारी कांता रंगराव जमादार (वय ५०) या महिलेस उलटय़ा व संडासचा त्रास सुरू झाल्याने उपचाराला नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री गहिनीनाथ महादेव जाधव (कारभार) (वय ६०) यांच्यावर उपचार न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तसेच श्रीमती जनतबी जमादार, सुदर्शन सुधाकर हराबे, रामराव माधव जाधव, दत्ता इराप्पा स्वामी, फुलाबाई शंकर गिरी, कस्तुरा बिराजदार, इंदा कांबळे, अनुसया घाटे, नूर महंमद शेख, पार्वती सुतार, सय्यद इनामदार, बिटू भोसले, काशीनाथ भोसले यांच्यावर गावातच ग्रामपंचायतीच्या आवारात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी खासगी रुग्णालयात १४ जणांवर उपचार करण्यात आले, तर ७० लोकांवर तीन दिवसांत उपचार करून घरी पाठविण्यात आले. गावात येणेगूर आरोग्य केंद्र, पंचायत समिती, उमरगा, ग्रामपंचायत यांचे पथक कार्यरत आहे. वैद्यकीय अधिकारी सूर्यवंशी, डॉ. जोशी, सरपंच शहाजी पाटील, उपसरपंच राजेंद्र समाने, पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील, विस्तार अधिकारी किरताळे रुग्णांवर उपचार करीत आहेत.