Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गणपत काकडे यांना होळकर पुरस्कार प्रदान
गेवराई, ७ जून / वार्ताहर

 

बहुजन समाज चळवळ, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध चळवळीतून रचनात्मक कार्य केल्याबद्दल येथील प्रा. गणपत काकडे यांना यंदाचा लातूर येथील राजे मल्हारराव होळकर ट्रस्टच्या वतीने राजे यशवंतराव होळकर स्मृती राज्यस्तरीय गौरव पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
प्रा. काकडे यांनी विद्यार्थीदशेतच समाजबांधवांचे संघटन, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे घोडय़ावर विराजमान झालेले चित्र प्रसिद्ध करून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रकाशित केले. गेल्या १० वर्षांपासून अहिल्यादेवींच्या बरोबरच इतर महापुरुषांच्या जयंती - पुण्यतिथींच्या कार्यक्रमाचे आयोजन, चौंडी येथील जयंतीसाठी दरवर्षी वाहनांची भव्य रॅलीचे आयोजन, पूरग्रस्तांना मदत, सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध शिबिरे, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या आरक्षण व इतर प्रश्नांसाठी वेळोवेळी मोर्चे, निदर्शने, घेराव, रास्ता रोको व आंदोलने संघर्ष समितीच्या माध्यमातून केलेली आहेत.
लातूर येथील राजे मल्हारराव होळकर ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय राजे यशवंतराव होळकर पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्रा. काकडे यांना जाहीर झाला होता. ५ जूनला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकदिन आणि मल्हराराव होळकर जन्मदिनी टाऊन हॉल येथे लातूरचे माजी खासदार गोपाळराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भाजपा राज्य प्रवक्ता गणेशराव हाके, अ‍ॅड. अण्णाराव पाटील, प्राचार्य मधुकर सलगरे, होळकर घराण्याचे वंशज अमरजीतदादा बारगळ, संभाजीराव सूळ, भातांब्रेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. काकडे यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.