Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नांदेडमध्ये ‘आषाढी महोत्सवा’चे आयोजन
नांदेड, ७ जून / वार्ताहर

 

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सव २००९ चे आयोजन करण्यात आले असून, यावर्षी प्रख्यात गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरुण दाते, उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांचे भक्तीगीत गायनाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२९ जून ते ३ जुलै ०९ असा पाच दिवसीय आषाढी महोत्सव कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रोज सायंकाळी ६ ते १० दरम्यान होणार असून २९ जूनला प्रसिद्ध गायक अरुण दाते यांच्या शुक्रतारा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद गुणाजी, पत्रकार खासदार भरतकुमार राऊत यांच्या हस्ते होणार आहे.
तीस जूनला प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या भक्तीगीत संध्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आमदार नीलमकुमार गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे.
एक जुलैला प्रख्यात गायक रवींद्र साठे यांचा स्वरांजली हा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन भय्यू महाराज यांच्या आशीर्वादपर उपस्थितीने होणार आहे. २ जुलैला प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांचा स्वरसुमनांजली या भक्तीगीताच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांच्या हस्ते होईल. ३ जुलैला दिवाकर चौधरी निर्मित विठ्ठल नामाचा गजर हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख अभिजीत पानसे यांच्या हस्ते होईल.मराठवाडय़ासह संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असलेला हा आषाढी महोत्सव नांदेड व परिसरातील जनतेला एक आगळीवेगळी पर्वणीच असते. दरवर्षी या कार्यक्रमात वेगवेगळ्या नामवंत कलाकारांची हजेरी तसेच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा गौरव या कार्यक्रमातून होत असतो. या वेळी उदयोन्मुख संगीतकार आदित्य ठाकरे यांनाही बोलाविण्याचा मानस आहे. असे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी सांगितले.