Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची वसमतमध्ये मागणी
वसमत, ७ जून/ वार्ताहर

 

तालुक्यातील ग्रामीण भागात कोणतीही डॉक्टरी डिग्री नसताना अनुभवाचा आधार म्हणून काही तरुण रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. तरी आरोग्य विभागाने अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सध्या शहरासह ग्रामीण भागात गॅस्ट्रोची साथ मोठय़ा प्रमाणात पसरली आहे. याचाच फायदा घेत काही तरुण डिग्री नसताना फक्त अनुभवाच्या आधारे ग्रामीण भागात डॉक्टरी व्यवसाय करीत आहे. हे तरुण खासगी डॉक्टरांकडे कम्पाऊण्डर म्हणून काही महिने काम करतात आणि त्या अनुभवावर ग्रामीण भागात डॉक्टर म्हणून आपली पकड मजबूत करून रुग्णाच्या जीविताशी खेळताना दिसून येत आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ग्रामीण भागात वाढला होता. त्यावेळी उपजिल्हा आरोग्य विभागाने तातडीने याबाबत दखल घेऊन अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचा सपाटा लावल्याने त्यास आळा बसला होता. आता आरोग्य विभागाने याबाबत दखल घेऊन अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.