Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रशिक्षणसत्रात शिक्षकांचा गोंधळ
उदगीर, ७ जून / वार्ताहर

 

जिल्हा परिषदेंतर्गत नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणवर्गास अनुपस्थित असणाऱ्या ८० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिल्यावरून शिक्षकांनी गोंधळ घातला. प्रशिक्षण विभागप्रमुख सी. ए. पठाण यांनी शिक्षकांना अरेरावीची भाषा केल्याने शिक्षक संतप्त झाले पठाण यांनी माफी मागितल्यावर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथी व आठवीचे प्रशिक्षणवर्ग चालू आहेत. हे वर्ग येत्या १२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायं. ५.३० या वेळेत चालणार आहेत. पहिलीचे २३७, चौथीचे २४० आणि आठवीच्या ३३५ शिक्षकांसह उर्दू माध्यमाचे पहिलीचे ३८, चौथीचे ३९ अशा एकूण ८८९ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
राज्य निरीक्षक भारत सातपुते यांनी ६ जूनला दुपारी या कार्यक्रमास भेट दिली. यावेळी काही शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. ७ जूनला त्या ८० शिक्षकांना गट शिक्षणाधिकारी हरिलाल जाधव यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. यात खासगी शाळेतील शिक्षकांची संख्या उल्लेखनीय होती.
७ जूनच्या सकाळी १० वा. नोटिसा देताच प्रशिक्षण कार्यक्रमात प्रचंड गदारोळ सुरू झाला. यावेळी त्या शिक्षकांना नोटिसा का दिल्या, असा दम काहींनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला व प्रशिक्षण विभाग प्रमुख पठाण अर्वाच्य भाषेत का बोलत आहेत, याचा जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सकाळी ११.३० वा. सुरू झाले. शेवटी गट शिक्षणाधिकारी जाधव यांनी पठाण यास आपण माफी मागावी, असा सल्ला दिला.
पठाण यांनी माफी मागितली तसेच जाधव यांनी कारणे दाखवा नोटिसा परत घेऊ, असे सांगताच हे आंदोलन संपले. नोटिसा माघारी घेत असलो तरी प्रशिक्षण काळात गोंधळ घालणाऱ्यांवर गंभीर कारवाई करणार असल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रशिक्षणात ८८९ शिक्षक प्रशिक्षण घेत असून त्यांना बसण्यासाठी तसेच नाष्टा व जेवणाची व्यवस्था योग्य प्रकारे होत नसल्याचे काहींनी दाखवून दिले. तर केवळ २५ रु.मध्ये नाष्टा व जेवण आपण उपलब्ध करून देत असून याचा शिक्षकांनी विचार करायला हवा, असे गट शिक्षणाधिकारी जाधव म्हणाले.