Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धारूर नगराध्यक्षपदाची निवड १२ जूनला
धारूर, ७ जून / वार्ताहर

 

धारूर येथील नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षांची मुदत १७ जूनला संपत आहे. यावेळी नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नवीन नगराध्यक्षाची निवड १२ जूनला होणार असून काही नगरसेवक सहलीवर गेले आहेत. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगर परिषदमध्ये येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची तारीख १२ जून ही निश्चित झाली असून, सर्व नगरसेवकांना नोटिसा काढल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. आगामी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. विद्यमान नगराध्यक्षा निलावती कुण्णे या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षा झाल्या होत्या. या वेळेस अनुसूचित जातीमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोदावरी लक्ष्मण सिरसट तर भाजपाक डून धर्मराज वैरागे इच्छुक उमेदवार आहेत. नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगर परिषदमध्ये एकूण १७ नगरसेवक असून बहुमतासाठी नऊ नगरसेवकांची गरज आहे. नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार व्यूहरचना करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस ७, काँग्रेस २ व शिवसेना १ असे १० नगरसेवक सहलीवर गेल्याचे वृत्त आहे. दोन दिवसांपासून शहरातून ते गायब असून दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकत नाही. यावरून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोदावरी सिरसट यांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.