Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वेतनश्रेणीतील अन्यायाविरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन
उदगीर, ७ जून/वार्ताहर

 

सहाव्या वेतन आयोगात आरोग्य सेवेतील सर्व वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, वरिष्ठ डॉक्टर यांच्या वेतनश्रेणीवर अन्याय झाल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवणी व जळकोट तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने केली.
सुधारित वेतनश्रेणी २००९ नुसार केंद्राने देऊ केलेल्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र शासनाने पीबी-३, १५६००-३९१०० ग्रेड पे ५००० ही वेतनश्रेणी न देता पीबी-२ ९३००-३४८०० ग्रेड पे ५४०० ही वेतनश्रेणी दिली आहे.
सुधारित वेतनश्रेणी मिळावी म्हणून आरोग्य सेवा अधिकारी महासंघाच्या लातूर विभागीय व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यात टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शासन यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन वैद्यकीय अधिकारी संवर्गावर झालेला अन्याय दूर होईल, अशी आशा निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांनी केली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील, डॉ. देविदास भोसले यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. डी. व्ही. पवार, डॉ. एस. व्ही. पवार, डॉ. प्रशांत कापसे आदींसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.