Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पारसमल जैन याने दिलेल्या जबाबात नेमके काय आहे?
निशांत सरवणकर, मुंबई, ७ जून

एचआयव्हीचे निदान झाल्याने पैशाची नितांत गरज होती. ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस

 

आयुक्त कैलास डावखर यांचा सुमारे २५ वर्षे खबरी म्हणून काम करताना अबकारी निरीक्षक असलेल्या मोहन शुक्ल याच्याशी ओळख झाली होती. त्यामुळे पैशासाठी शुक्लकडे गेलो. तेव्हा शुक्लने मला सांगितले की, पद्म्सिंह पाटील यांचे नातेवाईक असलेल्या पवनराजे निंबाळकर यांच्याशी संबंध बिघडले आहेत. त्यांच्या साखर कारखान्यातील घोटाळ्याची माहिती वर्तमानपत्रातून छापून आल्याने पद्म्सिंग पाटील यांची बदनामी झाली आहे. म्हणून पवनराजे निंबाळकर यांचा खून करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आणि मी ती स्वीकारली.
सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेल्या पारसमल जैन याने गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेल्या जबाबातील ही माहिती असून याची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. केवळ या जबाबावरच नव्हे तर आणखी पुराव्यांच्या आधारे पद्म्सिंह पाटील यांना अखेरीस अटक करण्यात आल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी स्पष्ट केले असले तरी जैन याचा जबाब महत्त्वपूर्ण ठरल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
जैन याने जबाबात म्हटले आहे की, तेरणा साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या लातूर येथील सतीश मंदाडे याला भेटण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आपण लातूरला जाऊन मंदाडेला भेटलो. त्यावेळी पनवराजे यांचा खून करण्यासाठी २५ लाखांची सुपारी देण्याचे ठरले. तात्काळ एक लाख रुपये देऊन पनवराजे यांचे निवासस्थान दाखविण्यात आले. त्यांचे छायाचित्र, लातून, उस्मानाबाद येथील बंगल्याचे पत्ते, पवनराजे नियमित येऊन बसत असलेला उस्मानाबाद येथील ट्रॅक्टरचा शोरुमही दाखविला. साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर दोन दिवस राहून डोंबिवलीला घरी परतलो. या कामासाठी गावाकडील मित्र बाबूसिंग राजपूत याची स्कॉर्पिओ गाडी (क्र. आरजे १४ यू ३५८३) घेऊन चालक अच्छू, बाबूसिंगसह लातूरला गेलो. परवाना असलेले पिस्तूल सोबत घेतले होते. राजूशेठच्या गेस्ट हाऊसवर तीन दिवस रहिलो. पवनराजे आढळून न आल्याने परत आलो. नंतर शूटर शोधण्यासाठी उत्तर प्रदेशातील बसखारी येथे गेलो. बसपाचा वरिष्ट कार्यकर्ता असलेल्या कैलास यादव याची भेट घेतली. त्याने छोटे पांडे या शूटरची ओळख करून दिली.
शस्त्र खरेदीसाठी पांडेला ५० हजार दिले. पिंटूसिंग (२२) व दिनेश तिवारी (३४) या दोघांना घेऊन पांडे मुंबईत आला. त्यांना घेऊन आपण लातूर येथे गेलो. पांडे हा दोन माऊझर घेऊन आला होता. मार्बल व्यावसायिक म्हणून लातूर येथील गेस्ट हाऊसवर थांबलो. पनवराजे मुंबईला निघून गेल्याने मुंबईत जाण्याचे ठरविले. मुंब्रा येथे आल्यानंतर पनवराजेंना फोन करून महेंद्र व मोहन जैन यांचा मित्र बोलत असल्याचे सांगून बार्शीमधील जमिन जैन मंदिर बांधण्यासाठी खरेदी करावयाची आहे, असे सांगितले. तेव्हा पनवराजे यांनी आपण शहाड येथील अंबर हॉटेलात थांबल्याचे सांगून शिळफाटा येथे भेटण्यास बोलाविले. त्यांचय स्कोडा गाडीचा क्रमांक दिला. आम्ही तेथे गेलो. परंतु हत्या करण्यासाठी जागा योग्य न वाटल्याने पनवेलच्या दिशेने निघून गेलो. पनवराजे याच मार्गाने पुण्याकडे वा गावाकडे निघतील असे वाटल्याने कळंबोली पुणे लिंक रोडच्या चौकात त्यांच्या गाडीची वाट पाहत राहिलो. त्याची गाडी येताच आपली इंडिका गाडी त्यांच्या समांतर घेतली आणि जैन अशी ओळख दिल्यानंतर चालकाला पवनराजे यांना उठविण्यास सांगितले. कोण आहे ते पाहण्यासाठी पवनराजे यांनी काच खाली करतातच दिनेश तिवारी, पिंटूसिंगने त्यांच्याकडील माऊजरमधून दोन गोळ्या झाडल्या.
छोटे पांडेने चालकाला मारण्यास सांगितल्याने त्याच्याही डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. दिनेश व पिंटूला लगेच उत्तर प्रदेशात निघून जाण्यास सांगितले. इंडिका गाडी खोपोली येथे सोडून आपण मुंबईत ग्रँट रोजला आलो आणि मोहन शुक्लला फोन केला. शुक्ल याने मला गावी जाण्यास सांगितले आणि दहा-बारा दिवसांनी पैसे घेण्यासाठी परत येण्यास सांगितले. परत आल्यावर पैशाची मागणी केल्यानंतर आपल्याला उदयपूर येथे जाण्यास सांगितले.
ठाणे घोडबंदर रोडवरून माझी बस जाणार होती. तेथील फाऊंटन इन हम्ॉटेलजवळ बस थांबविण्यास सांगितल्यानंतर शुक्ल याने तेथे येऊन २५ लाख रुपयांची बॅग दिली. यापैकी २० लाख रुपये कैलास यादवला दिले. यापैकी छोटे पांडे याने सात लाख, पिंटूसिंग व दिनेश याना प्रत्येकी चार लाख तर कैलास यादवने पाच लाख आणि आपल्याला पाच लाख मिळाले. पवनराजेंच्या हत्येनंतर अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारीही मंदाडेने देऊ केली होती. मात्र आपण ती नाकारली आणि पुन्हा मंदाडेला संपर्क साधला नाही, असेही जैन याने या जबाबात म्हटले आहे.