Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘डॉक्टरां’च्या अटकेने राष्ट्रवादी काँग्रेसने धरले अंथरुण!
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने पवनराजे निंबाळकर खून प्रकरणात अटक केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सणसणीत चपराक बसली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर हा दहा वर्षाचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू असताना पद्मसिंह पाटील यांच्या खूनबाजीमुळे पक्षाचा विद्रुप, भेसूर चेहरा समोर आला

 

आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सीबीआयने पद्मसिंह पाटील यांना गजाआड केल्याने निवडणुकीत त्याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची भीती राष्ट्रवादीतील अनेक नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘कायद्यानुसार जी कारवाई होणार असेल ती होईल’, असे सांगत चक्क हात झटकले. पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने न्यायालयात हजर केले तेव्हा राष्ट्रवादीचा एकही नेता तेथे फिरकला नाही. त्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादीने नेते असलेले पैलवान पद्मसिंह पाटील आज राष्ट्रवादीसाठी ‘गले की हड्डी’ बनले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘डॉक्टर’ या नावानेच ओळखले जाणारे पैलवान पद्मसिंह पाटील हे दहशतीचे दुसरे नाव होते. उस्मानाबादमध्ये तर ‘डॉक्टरां’चे बोलावणे आले की अनेकांना ताप भरत होता. दररोज शेकडो जोर, बैठका मारणारे दुधाचा रतीब लावलेले पद्मसिंह पाटील त्यांच्या पैलवानकीसाठीच राजकारणात ओळखले जायचे.
निवडणुकीपूर्वी गावात बुलेटवर फिरून दहशत बसविणारा हा पैलवान निवडणुकीच्या मतदान केंद्रात अथवा मतमोजणी केंद्रात डीप्स मारायला लागला की मतदारांची बोटं आपसूक ‘घडय़ाळा’कडे वळत. मतदारांवर दहशत बसविण्याकरिता डॉक्टरने आपल्या पैलवानकीचा व्यवस्थित वापर केला होता. १९७८ पासून सात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या पद्मसिंह पाटील यांना २००४ च्या निवडणुकीत जेमतेम ४८४ मतांनी विजय मिळाला होता.
हा विजय आपला पराभव असल्याचे डॉक्टरांना वाटत होते. त्यामुळे निवडणूक काळात सक्रिय नसलेल्या तीन ते चार कार्यकर्त्यांना बंगल्यावर बोलावून डॉक्टरांनी ‘इंजेक्शन’ दिले होते, अशी चर्चा उस्मानाबादपासून मुंबईपर्यंत होती.
विधानसभेत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी डॉक्टरांचा एकदा संघर्ष झाला होता. मुंडे यांच्यावर ‘नपुंसक’ असल्याचा आरोप करीत डॉक्टरांनी मुंडेंवर हल्लाच चढवला. बाकी कोणताही आरोप सहन करीन पण हा नाही, असे मुंडे यांनी त्यावेळी त्यांना सुनावले होते. औरंगाबाद येथे एकदा चोरांनी पद्मसिंह पाटील यांची गाडी अडवून लूटमारीचा प्रयत्न केला. तेव्हा हा पैलवान स्वत: रिव्हॉल्वर घेऊन रस्त्यावर उतरला आणि त्याच्या समर्थकांनी दगडफेक करून चोरांना पळवून लावले.