Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पवारांना ‘दे धक्का’
मुंबई, ७ जून / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळूनही शरद पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकावर शपथ देण्यात आली होती आणि राष्ट्रवादीची खात्यांची मागणीही काँग्रेस हायकमांडकडून पूर्ण करण्यात आली होती.
या पाश्र्वभूमीवर पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने केलेली अटक हा विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलेला ‘दे धक्का’ असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या.

 

राष्ट्रवादीची पडझड होऊनही शरद पवार यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची तिसऱ्या क्रमांकावर शपथ दिली गेली. कृषि, नागरी उड्डाण यासारखी राष्ट्रवादीकडे मागील सरकारमध्ये असलेली खाती काँग्रेसने त्या पक्षाला दिली. शरद पवार यांच्यावर काँग्रेस मेहरबान झाल्याने विलासराव देशमुख यांच्यासारखे शरद पवार विरोधक अस्वस्थ झाले असतानाच सीबीआयने राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी अटक करून काँग्रेसचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. देशभरातील अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरणे सीबीआयकडे तपासाकरिता पडून असताना राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्याच प्रकरणात कारवाई करून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन पावले मागे जायला भाग पाडणे हाच कारवाईमागील हेतू असल्याचे बोलले जाते.