Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आनंदमूर्ती व त्यांच्या पंथाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - जोगळेकर
मुंबई, ७ जून / प्रतिनिधी

श्री श्री आनंदमूर्ती यांच्या शिष्यांना दहशतवादी म्हणून आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबण्यात

 

आले होते. त्यावेळी येरवडा तुरुंगात त्यांचा जवळून परिचय झाला. तेव्हा आनंदमूर्ती यांच्या कार्याची आणि त्यांच्या पंथाची महती समजली. ते दहशतवादी नव्हते. आनंदमूर्ती व त्यांच्या पंथाचे कार्य समजासाठी प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी शनिवारी केले.
श्री श्री आनंदमूर्ती यांच्या जंयती निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री प्रभा अत्रे यांचा डॉ. प्रभाकर सांडू यांच्या हस्ते खास गौरवही करण्यात आला.
आनंदमूर्ती प्रचारक संघाची सांस्कृतिक शाखा असलेल्या रेनासा आर्टिस्ट अण्ड राईटर्स असोसिएशन (रावा) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जोगळेकर पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदमार्गी यांच्यासोबतचे जुने नाते नव्याने जोडले गेले. १७व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आनंदमूर्ती नावाचे कवी, संगीतकार होऊन गेले. त्यांनी असंख्य गीत रचना केल्या. रघुनाथ स्वामी यांचे ते शिष्य होते.
संगीताच्या माध्यमातून त्यांनी मोठे समाजकार्य केले आहे. ते कीर्तन करायचे तेव्हा ‘वृदावंन’ डोलायचे.
इतक्या ताकदीचा संगीतकार १७व्या शतकात झाला तर १९व्या शतकातील श्री श्री आनंदमूर्ती त्याच ताकदीचे होते. ‘प्रभात’ संगीत दिनी प्रभा अत्रे यांचा सत्कार हा एक वेगळाच योगायोग आहे, असे स्पष्ट करून जोगळेकर यांनी आनंदमूर्ती यांचे समाजकार्य आणि संगीत, साहित्य, तत्वज्ञान क्षेत्रातील कार्याचा त्यांनी गौरव केला. संगीतात अनेक घराणी आहेत, तसेच अलीकडच्या काळातील ‘प्रभात’ हे एक संगीतातील घराणेच आहे, असेही जोगळेकर म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ सचदेव यांनीही आपले विचार मांडले. माणसाला माणूस बनविण्याचे सामथ्र्य संगीतात आहे. हे आनंदमूर्ती यांनी दाखवून दिले होते.
त्यामुळेच ते श्रेष्ठ आहेत, असे सचदेव म्हणाले. आनंदमूर्ती यांच्या नावाभोवती अनेक वाद निर्माण झाले. मात्र त्यांनी समाजाला एक तत्वज्ञान दिले. त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्च केले. रवींद्र संगीतानंतर अशा प्रकारचे नवीन संगीत म्हणजे प्रभात संगीत, असा गौरवही सचदेव यांनी केला.
आपल्या कामाची कोणी नोंद घेतली की, आनंद होतो. साधनेच्या मार्गावर एक पाऊल टाकणे अवघड पण रसिकांनी मला नेहमीच साथ दिली म्हणून आपला इथवर प्रवास झाला, असे मत सत्काराला उत्तर देताना प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्र टाइम्स’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अशोक पानवलकर यांनीही आनंदमूर्ती यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्री श्री आनंदमूर्ती यांनी विविध भाषांत ५ हजार १८ रचना केल्या. हे एक आश्चर्य आहे, असे पानवलकर म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आनंदमूर्ती यांच्या संस्थेच्या शाळेतील नम्रता जमदाडे या लहान मुलींने प्रभात संगीतावर नृत्य सादर करून सर्वाचे स्वागत कले. शेवटी अश्निी भिडे- देशपांडे यांनी प्रभात संगीतातील चार रचना सादर केल्या.