Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

दहशतवादी निसटल्याचा महत्त्वाचा संदेश पोहोचलाच नाही..!
एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन, कविता अय्यर/स्वाती खेर
मुंबई, ७ जून

इस्पितळाच्या आवारात तेव्हा दोन प्रेते पडलेली त्यांना आढळली. दोन बंदुकधारी तरुण जिन्यावरून चालत गच्चीकडे गेल्याचे लिफ्टमनने त्यांना सांगितले. या बंदुकधाऱ्यांनी वर जाण्यापूर्वी सुरक्षारक्षक रावसाहेब फुंडे आणि इतर काही जणांना स्वच्छतागृहात कोंडून ठेवल्याची माहितीही

 

लिफ्टमनने दिली. दाते आणि त्यांचे सहकारी सहाव्या मजल्यावर व नंतर गच्चीपर्यंत पोहोचले. अतिरेकी कोठे आहेत याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने त्यांनी धातूच्या काही पट्टय़ा गच्चीच्या दरवाजाच्या दिशेने फेकल्या. दाते आणि त्यांचा वायरलेस ऑपरेटर हे सर्वात पुढे होते, तर इतर पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट्स घातलेली नसल्यामुळे ते मागून चालत होते. अचानक वरून एके-४७ मधून जोरदार गोळीबार सुरू झाला. पोलिसांनीही त्या दिशेने गोळीबार केला, तेव्हा दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने एक हातबॉम्ब फेकला. त्यात जवळपास सर्वच पोलीस जखमी झाले. दरम्यान, दाते आणि वायरलेस ऑपरेटर सतत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून जादा पोलीस कुमक पाठविण्यास सांगत होते. त्याच वेळी अतिरेक्यांनी आणखी तीन हातबॉम्ब पोलिसांवर फेकले. रात्री ११.४५ वाजता पोलिसांकडील दारूगोळा संपला. जखमी अवस्थेतील पोलीस हळूहळू जिन्यावरून खाली उतरू लागले. त्यांना वैद्यकीय उपचाराचीही गरज होती. पोलीस नियंत्रण कक्षाशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना सांगण्यात आले. सदानंद दाते हे होते त्याच ठिकामी एका भिंतीआड उभे राहिले. भिंतीमुळे बॉम्ब हल्ल्यापासून त्यांना स्वत:चा बचाव करता येत होता. त्यांच्यासमोर एक पोलीस मरून पडलेला, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत विव्हळत होता.
दाते यांचे सततचे फोन आणि एसएमएस यामुळे सुमारे ८० पोलिसांचे पथक केवळ ४० मिनिटांतच कामा इस्पितळात पोहोचले होते, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. या ८० जणांच्या पथकात ‘एसआरपी’ची (राज्य राखीव पोलीस दल) एक तुकडी, आठ पोलीस वाहने, त्या प्रत्येक वाहनात आठ ते १८ पोलीस होते आणि त्यातील बहुतांश पोलीस सशस्त्र होते. परंतु हे पथक तेथे दिसलेच नाही. ते आल्याचे जाणवलेही नाही. दहशतवाद्यांचा मुकाबला करणे, त्यांना पळून जाण्यास अटकाव करणे हे तर सोडाच; पोलीस पथक कामा इस्पितळात दाखल झाल्याचेही कोणाला जाणवले नाही. जादा पोलीस कुमक तातडीने यावी यासाठी दाते आणि त्यांचे सहकारी आग्रहाने सांगत होते हे पोलीस सूत्रांनी मान्य केले. आझाद मैदान पोलीस ठाणे कामा इस्पितळाला लागूनच आहे. इतर दोन पोलीस ठाणी आणि शहर पोलीस मुख्यालय दोन कि.मी. पेक्षाही कमी अंतरावर आहे. असे असूनसुद्धा जादा पोलीस कुमक तात्काळ आली नाही.
रात्री ११.४५ : दाते यांचा वायरलेस ऑपरेटर जखमी अवस्थेत इमारतीतून बाहेर पडला. कामा इस्पितळाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ आला आणि करकरे, कामटे, साळसकर त्याला दिसले. तो धावतच त्यांच्याजवळ गेला. दातेसुद्धा जखमी झाल्याचे त्याने त्यांना सांगितले. तेव्हा साळसकर यांच्या गाडीतून त्या वायरलेस ऑपरेटरला उपचारासाठी इस्पितळात पाठविण्यात आले. गच्चीवरील गोळीबार थांबला होता. याचवेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा वाहनचालक मारुती फड याला ताबडतोब मंत्रालयात कामासाठी येण्यासंबंधी फोन आला. रंगभवन गल्लीतील सरकारी कर्मचारी वसाहतीतून तो तातडीने निघाला. बऱ्याच वेळेपासून सुरू असलेला गोळीबार त्याने ऐकला होता. त्यामुळे कामा इस्पितळात पोलीस पथक पोहोचल्याचे त्याला माहिती होते.रात्री ११.५० : दाते यांच्याकडील दारूगोळा पूर्ण संपला होता. ते जखमीही झाले होते. तशातच त्यांनी संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) के.एल. प्रसाद यांना टेक्स्ट मेसेज पाठवून दोन दहशतवादी पळून गेल्याचे कळविले. कसाब आणि इस्माईल कामा इस्पितळातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आले. इस्पितळाच्या पुढच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या रस्त्यावर आले. करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याचवेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. रस्त्यावरच कसाब आणि इस्माईलने एका वाटसरूला गोळ्या घालून ठार केले होते.मारुती फड हा रंगभवन गल्लीतून मेट्रो सिनेमामार्गे मंत्रालयाकडे गाडीतून असताना कसाब आणि इस्माईल दोघेही शांतपणे चालत महापालिका मार्गावरून पुढे निघाले होते. त्यांनी मारुती फडवर गोळीबार केला.रात्री ११.५५ : मारुती फडच्या हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या होत्या. त्याचे कुटुंबिय एकसारखे पोलिसांना फोन करीत होते. माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माझ्यावर गोळीबार झाल्याचे माझी पत्नी आणि भाऊ यांनी घराच्या खिडकीतून पाहिले होते, अशी माहिती मारुती फड याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.मारुतीची गाडी उघडण्याचा कसाब आणि इस्माईलने प्रयत्न केला, परंतु ‘पॉवरलॉक’मुळे त्यांना गाडी उघडता आली नाही. तेव्हा कसाब आणि इस्माईल दोघेही सरकारी कर्मचारी वसाहतीतील झुडपाच्या मागे दडून बसले. नंतर थोडावेळ कंपाऊंडमध्ये जाऊन त्यांनी ‘मॅगेझिन्स’ बदलली आणि सज्ज होऊन पुन्हा झाडा-झुडपांच्या आड लपून बसले. कॉर्पोरेशन बँक एटीएम सेंटरजवळील झाडा-झुडपांमुळे तेथे अंधार होता. त्यामुळे दोघांना तेथे लपायला जागा मिळाली. त्यानंतर १५ मिनिटे पूर्ण शांतता होती, असेही मारुती फड याने सांगितले.या १५ मिनिटांच्या अवधीत मारुती फडच्या कुटुंबियांनी नियंत्रण कक्षाला पाठविलेला संदेश, माहिती, नियंत्रण कक्षाकडून हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. फडवर ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तेथून केवळ १०० मीटर अंतरावर हे तीन अधिकारी होते. कामा इस्पितळाच्या मागच्या प्रवेशद्वारापाशी काही पोलिसांना थांबवून कामटे, करकरे आणि साळसकर तिघे पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या टोयाटो क्वॉलिस गाडीतून निघाले होते. साळसकर हे गाडी चालवित होते. अन्य चार पोलीस मागे बसलेले होते. सर्वजण कॉर्पोरेशन बँक एटीएम सेंटरकडे निघाले..रात्री १२.१० : मारुती फड हे आपल्या गाडीच्या खाली जखमी अवस्थेत पडले असतानाच त्यांना क्वॉलिस गाडी येत असल्याचे जाणवले. त्यांनी मान वर करून पाहिले, तेव्हा झाडाझुडपांआडून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. पोलीस आणि दहशतवादी यांच्यात सुमारे १० मिनिटे गोळीबार सुरू होता.पोलिसांच्या वाहनातून होणारा गोळीबार बंद होताच दोघे दहशतवादी पोलिसांच्या गाडीजवळ गेले आणि त्यांनी पुन्हा गोळीबार केला, असे मारुती फडने सांगितले. तो पुढे म्हणाला, पोलिसांच्या गाडीतच पुढच्या भागात बसलेल्यांची प्रेते दहशतवाद्यांनी ओढून बाहेर काढली आणि रस्त्यावर फेकून दिली. आता ते माझ्याकडे वळतील, या भीतीने मी गाडीखाली लपलो.त्यानंतर १५/२० मिनिटांनी दुसरी पोलीस गाडी आली आणि त्या गाडीतील पोलिसांनी मारुती फडला बाहेर काढले. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस निघाले. जवळच्याच इस्पितळात मारुती फडला दाखल करण्यात आले.
(क्रमश:)