Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अद्ययावत शाळा!
सोपान बोंगाणे, ठाणे, ७ जून

आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी पॅकेजमधून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या वाटपावरून कुटुंबियांत नवे वाद सुरू झाले. त्यात भरडल्या जात असलेल्या मृत

 

शेतकऱ्यांच्या निराधार मुलांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी विदर्भातील खामगाव येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची अद्ययावत व सुसज्ज निवासी शाळा नुकतीच सुरू झाली आहे.
राज्यात हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात त्यांच्या निरपराध मुलांचे भावविश्व करपून गेले. सरकारचे ‘पॅकेज’ त्यांचे भविष्य घडवू शकले नाही. त्यासाठी त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याची गरज ओळखून इंदूरच्या श्रीसद्गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टने ही शाळा सुरू केल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रणेते भय्यू महाराज यांनी डहाणू येथे दिली. खामगाव येथे संस्थेच्या पाच एकर जमिनीवर ही शाळा सुरू झाली आहे. गेल्या शनिवारी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहेत. आतापर्यंत सुमारे ३०० मुलांचे प्रवेश पूर्ण झाले असून, आणखी १०० मुला-मुलींना यंदा प्रवेश देण्यात येणार आहे. या मुलांना संगणकाचे ज्ञानही देण्यात येणार आहे.