Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये
गडकरींचे भाकित
नागपूर, ७ जून/ प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वाचे लक्ष विधानसभेकडे लागले असून राजकीय पक्षांनीही त्यांच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली नसली तरी भाजपला मात्र या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील, असा विश्वास आहे व त्याच दृष्टीने पक्षाने तयारीही सुरु केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली नसली तरी नवीन विधानसभा ही ऑक्टोबर महिन्यात अस्तित्वात येणे जरूरी आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी सुरु केली आहे. नवीन मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून २२ जुलैपर्यंत हे काम चालणार आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे कामही सुरु झाले आहे. प्रशासनाप्रमाणेच राजकीय पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. भाजप त्यात आघाडीवर आहे. खुद्द गडकरी यांनीच ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याचे भाकित आज नागपूर येथे केले.
ऑक्टोबर महिन्यात निवडणुका आणि १६ ऑगस्टपासून आचारसंहिता लागू होणार असल्याने जी कामे करायची आहे, ती तात्काळ करा, किमान भूमिपूजन तरी करा, अन्यथा मतदारांच्यापुढे कोणत्या तोंडाने जाणार, असा सवालच त्यांनी आज पदाधिकाऱ्यांना आढवा बैठकीत केला.
लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप नेते धास्तावले आहेत. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी या पक्षाच्या नेत्यांनी सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नागपूर महापालिका पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी गडकरींचे प्रयत्न कारणीभूत ठरले होते. मात्र यावेळी त्यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. याचा फटका येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला नागपुरात बसू शकतो हे ओळखूनच त्यांनी रविभवनात आज अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जाहीरनाम्यात दिलेले २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आणि सर्व अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्याचे आश्वासन दोन वर्षांपासून कागदावरच आहे, अद्याप या कामांना सुरुवात तर सोडा त्याच्या निविदाही निघाल्या नाहीत, वेळ कमी असल्याने जे काही करायचे ते तात्काळ करा, अधिकाऱ्यांना कुणीच काही म्हणत नाही, पण राजकीय नेत्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते. चोवीस तास पाणी पुरवठा सुरु न झाल्याने जनता भाजपवर टीका करीत आहे, ही बाब समजून घ्या, असे गडकरी यांनी या बैठकीत सांगितले. गडकरी यांनी केलेले भाकित आणि त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी बघता निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.