Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाच प्राधान्य
नागपूर, ७ जून/प्रतिनिधी

 

सध्या सर्वच क्षेत्रावर जागतिक मंदीचा परिणाम झाला आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असते. मात्र, गेल्या काही महिन्यात आलेल्या मंदीमुळे यावर काही प्रमाणात परिणाम होईल असे वाटत असले, तरी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत विशेष घट झाली नसल्याचे दिसून येत आहे. एआयईईई आणि एमएचसीईटी परीक्षांमध्ये अभियांत्रिकीचा पर्याय दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही बाब स्पष्ट होते.
यंदा राज्यात सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमाची ‘सीईटी’ दिली. यापैकी सुमारे सव्वा लाख विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. वास्तविक, गेल्या वर्षी राज्यात अभियांत्रिकीसाठी ६० हजार जागा उपलब्ध होत्या. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे, १४ जूनला सीईटीचा निकाल जाहीर होणार आहे. हे निकाल जाहीर होण्याअगोदरच विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेण्याचे आणखी एक कारण वैद्यकीय अभ्यासक्रमाचे भरगच्च शुल्क. एमएचसीईटी परीक्षेमध्येही यंदा फक्त नागपूर विभागातून १५ हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचा पर्याय दिला होता. तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून अनेक नवी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू होणार असल्याने अभियांत्रिकीकडेच विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक अलीकडेच जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्यातील खासगी व सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. तर स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया वेगळी असेल. स्वायत्त अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जूनपासून सुरुवात होत आहे, तर सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेला १७ जूनपासून सुरुवात होणार आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया येत्या १७ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. संचालनालयाने आखलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी सेंटर) १७ ते २७ जून या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी व प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरावयाचे आहेत. संचालनालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जामधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ८ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेची पहिली फेरी ११ ते २४ जुलै या कालावधीत होईल. पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीत मिळालेल्या क्रमांकांच्या आधारे स्वत:ला हव्या असलेल्या महाविद्यालयांचे ‘प्राधान्यक्रम अर्ज’ (ऑप्शन फॉर्म) भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गुणवत्तानिहाय त्यांचे महाविद्यालय व अभ्यासक्रम निश्चित केले जातील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रवेशप्रक्रियेच्या चार फेऱ्या होणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण जागांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. ३० जून ते १ जुलै दरम्यान अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) महाविद्यालयांतील मान्यताप्राप्त जागांची माहिती संचालनालयाकडे उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारे तीन जुलैपर्यंत माहितीपत्रके छापण्यात येतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.