Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा
* पाणी चोरी थांबवा, उत्पन्न वाढवा
* गडकरींनी घेतला महापालिकेच्या कामाचा आढावा
* अंबाझरीत फुडप्लाझाचा प्रस्ताव
* एमएडीसीच्या मदतीने अग्निशामक यंत्रणा सक्षम करणार
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

२४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपला दोनवर्ष झाली तरी, सर्व वस्त्यांनापुरेसे पाणी देण्यात अपयश आल्याने पक्षाचे राज्याध्यक्ष नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करीत पाण्याची चोरी थांबवा आणि वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा, अशा सूचना पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना केल्या. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत सिमेन्ट रस्त्याच्या निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वी काढा, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज गडकरी यांनी रविभवन येथे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक धेतली. नियोजित वेळेच्या तब्बल दोन तास उशिरा सुरू झालेल्या बैठकीत सिमेन्ट रस्ते, पाणी प्रश्नाचे मुद्दे प्रामुख्याने चर्चीले गेले. शहरात पाण्याची टंचाई आहे मात्र, २३० दशलक्ष घनमीटर पाणी चोरीस जात आहे, या चोरीवर कुणाचेच नियंत्रण नाही, जनतेला पाणी दिले नाही तर, त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पाणी वाटपाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करा, असे गडकरी म्हणाले.
नागपुरात सिमेंटचे रस्ते तयार करताना त्यात राखेचा वापर करावा, वीज प्रकल्पातून राख विनामुल्य मिळत असल्याने आणि राखेपासून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. त्यामुळे रस्ते बांधणीवरील खर्च कमी होईल, अशी सूचना गडकरी यांनी केली. ५० टक्के राख वापरण्याचा गडकरी यांचा आग्रह या कामासाठी नेमण्यात आलेले सल्लागार जैन आणि महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी मानला नाही, ५० ऐवजी ३० टक्के राख वापरून रस्त्यांचे बांधकाम करू, असे आश्वासन त्यांनी दिले. काहीही करा पण या कामाच्या निविदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काढा, अशा सूचना गडकरींनी केल्या. आयुक्तांनीही याबाबत तात्काळ पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
महापालिकेची आर्थिकस्थिती नाजूक आहे, उत्पन्नात वाढ केली नाही तर भविष्यात कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायला पैसे शिल्लक राहणार नाही. वीज मंडळाला पाणी देण्याचा करार महापालिकेने केला आहे. त्यांच्याकडून २० वर्षांचे पैसे एकत्रित घ्या आणि पाणी पुरवठा योजनेची कामे करा, असे गडकरी म्हणाले.
प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कामत यांनी अंबाझरी उद्यानाजवळील मोकळ्या जागेत ‘फुड फ्लाझा’ तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेने यावर गांभीर्याने विचार करावा, शहरातील पाच हजार तरुणांना रोजगार मिळू शकेल, असे गडकरी म्हणाले. यासाठी त्यांनी कामथ यांच्याशी चर्चेची तयारीही दर्शवली. महाराष्ट्र एअरपोर्ट विमानतळ विकास कंपनीच्या मदतीने महापालिकेचा अग्निशामक विभाग आंतराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा प्रस्तावही गडकरींनी यावेळी दिला. मिहानच्या निमित्ताने मोठे उद्योग येत आहेत. उंच इमारती उभ्या राहणार आहे. अशा वेळी अग्निशामक विभागाकडे अत्याधुनिक व पुरेशी यंत्रसामुग्री असावी लागणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मदतीने हा विभाग आंतराष्ट्रीय दर्जाचा होऊ शकतो, यासाठी एमएडीसीचे उपाध्यक्ष आर.सी.सिन्हा यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे गडकरी म्हणाले.

यशवंत स्टेडियममधील दुकांनावर पुन्हा कारवाई
यशवंत स्टेडियममध्ये बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने पुन्हा कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या आढवा बैठकीनंतर आयुक्त असीम गुप्ता यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, न्यायालयाचा आदेश माहापालिकेच्या बाजुने आहे. दुकानांना ठोकलेले सिल काढण्यास न्यायालयाने सांगितले पण बेकायदेशीरपणे ताबा घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली, त्यामुळे ज्यानी महापालिकेची परवानगी न घेता गाळ्यात बांधकाम केले असेल व ज्यांनी परस्पर गाळा दुसऱ्यांना विकला असेल त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल. संबंधितांना नोटीसेस पाठवण्यात आल्या आहेत. यशवंत स्टेडियमध्ये एकूण ११० गाळे आहेत. त्यापैकी यापूर्वी ४० गाळे मालकांवर कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन महापालिकेच्या इतरही व्यापारी संकुलात बेकायदेशीरपणे गाळा ताब्यात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.