Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सावत्र मातेचा खून; तिघांना अटक
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

मुलांनी मित्राच्या मदतीने सावत्र मातेचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना उत्तर नागपुरातील फारुक नगरात शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.
इसरतजहाँ यार मोहम्मद हे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पाचपावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख नगरात राहणाऱ्या यार मोहम्मद अन्सारी यांच्याशी तिचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला. यार मोहम्मद यांची पहिली पत्नी मुकेदुन्निसा व तिची मुले यामुळे नाराज होती. संपत्तीत आणखी एक वाटेकरी झाल्याची त्यांची भावना होती. या कारणावरून त्यांची कुरबुर सुरू राहायची. गुलामनबी यार मोहम्मद अन्सारी (रा. कमर कॉलनी), मोहम्मद शफी ऊर्फ लल्लू यार मोहम्मद (रा. भानखेडा) व मोहम्मद सलीम मोहम्मद आसिफअली (रा. अन्सार नगर) या तीन आरोपींनी शनिवारी इसरतजहाँला तिच्या खोलीत कोंडून ठेवले. मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास धारदार चाकूने तिला भोसकले.
या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. माहिती समजताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहोचले. फारुख नगरातील यार मोहम्मदच्या घरातील खोलीत रक्ताचा सडा पडला होता. भिंतीवर रक्ताचे शिंतोडे होते. पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.