Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

५२ परिचारिकांना काढल्याने जिल्हा परिषदेत खळबळ
नागपूर, ७ जून / प्रतिनिधी

 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेत एक वर्षांपूर्वी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या ३२५ परिचारिकांपैकी (एएनएम) ५२ परिचारिकांना तडकाफडकी काढून टाकण्यात आल्याने आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कारवाई आरोग्य उपसंचालकांच्या आदेशान्वये करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिवाकर धांडे यांनी दिली. असे असले तरी यातील अन्य परिचारिकांना सामावून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ात एकूण ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३१६ उपकेंद्रे आहेत. उपकेंद्राच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सेविकेला मदत व्हावी, माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावातच महिलेची प्रसूती व्हावी, यासाठी गेल्यावर्षी जिल्ह्य़ात ३२५ परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. मात्र एका वर्षांनंतर त्यातील ५२ परिचारिकांना काढून टाकण्यात आल्याने त्या बेरोजगार झाल्या असून त्यांच्यापुढे नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी आरोग्य उपकेंद्राच्या इमारती नाहीत तर अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे परिचारिकांना काढून टाकण्यात आल्याचे समर्थन करण्यात येत असले तरी, ही बाब एक वर्षांपूर्वी शासनाच्या लक्षात आली नव्हती काय, असा प्रश्न संबंधित परिचारिका करत आहेत.
आरोग्य उपसंचालकांच्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे डॉ. धांडे यांनी सांगितले. त्यांची नियुक्ती अकरा महिन्याच्या कंत्राटाद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना काढता येते. काही परिचारिकांना अन्य ठिकाणी सामावून घेण्यात आले आहे. काही गावांमध्ये उपकेंद्राच्या इमारती नाहीत तर काही गावांमध्ये उपकेंद्रांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित परिचारिकांना सामावून घेतले जाईल, असेही डॉ. धांडे यांनी स्पष्ट केले.