Leading International Marathi News Daily

सोमवार, ८ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पूजा अन् वटवृक्ष संगोपनाचा निर्धारही..
नागपूर , ७ जून / प्रतिनिधी

 

भारतीय परंपरेनुसार जन्मोजन्मी हाच पती लाभावा या मनीषेने महिलांनी आज वटसावित्रीचे व्रत पूर्वापार प्रथेनुसार मोठय़ा श्रद्धेने व उत्साहाने करतानाच त्याला आधुनिकतेची जोड देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने घरोघरी किमान एक वृक्ष लावण्यात यावा, या हेतूने सामाजिक वनीकरण विभागातर्फे शहरातील विविध भागात वाटप करण्यात आलेल्या वडाच्या झाडाच्या रोपटय़ांचा स्वीकार करीत त्यांची पूजा करतानाच ते रोपटे अंगणात लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धारही केला.
आज सकाळपासून शहरातील विविध भागात असलेल्या वटवृक्षांची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. ज्या भागात वडाची झाडे नव्हती तेथे वृक्षारोपण करून त्यांची पूजा करण्यात आली. वडाचे झाड हे दीर्घकाळ टिकणारे असून त्याला विपुल पर्णसंभार असतो. त्यामुळे वडाची झाडे हवा प्रदूषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणाचे कामही उत्तम रितीने करतात. वडाच्या पारंब्या जमिनीत रुजल्यास त्यातून पुन्हा वडाचे झाड येते म्हणून या झाडाला अमर मानले जाते.
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विविध रोपवाटिकोंमध्ये १ लाख वडाची रोपे तयार करण्यात आली व आज सामाजिक संघटनांमार्फत त्यांचे वाटप करण्यात आले. पूर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्त्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा रुढ केली.